भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना रांची येथे खेळला गेला. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० मध्ये न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला होता आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात हर्षल पटेलने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने एका यादीत स्थान मिळवले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात हर्षल पटेलने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मोहम्मद सिराज जखमी झाल्याने त्याला ही संधी मिळाली आहे. अजित आगरकर यांच्या हस्ते त्याला भारतीय टी२० संघाची टोपी देण्यात आली आहे. हर्षल पटेलने वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने वयाच्या ३० वर्ष ३६१ दिवस झाले असताना आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले होते. दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले होते. तिसऱ्या स्थानी श्रीनाथ अरविंद आहे त्याने वयाच्या ३१ वर्षे आणि ६ व्या महिन्यात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले होते. चौथ्या स्थानी स्टुअर्ट बिन्नी आहे. त्याने वयाच्या ३१ वर्षे आणि ४४ दिवस झाले असतांना आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले होते. पाचव्या स्थानी मुरली विजय आहे. त्याने वयाच्या ३१ वर्षे आणि ३९ दिवस झाले असतांना आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केलेले.
आयपीएल २०२१ मध्ये हर्षल पटेलने ‘पर्पल कॅप’ देखील जिंकली होती. त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत स्थान मिळवले होते. हर्षल पटेलने आपल्या पहिल्या सामन्यात दोन गडी बाद केले.