बीसीसीआयनं अलीकडेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी संघामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळालं आहे. यापैकी एक नाव म्हणजे हर्षित राणा याचं. त्यानं अद्याप एकाही फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण केलेलं नाही.
हर्षितची मर्यादीत षटकांच्या संघात अनेकवेळा निवड झाली होती, परंतु तो प्लेइंग 11 चा भाग बनू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा राखीव खेळाडूंमध्येही समावेश करण्यात आला होता. मात्र दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनंतर त्याला रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये खेळण्यासाठी रिलिज करण्यात आलं. तो सध्या रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळत आहे, जेथे त्यानं अष्टपैलू कामगिरीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपला दावा मजबूत केला.
हर्षित राणानं आसामविरुद्ध सर्वप्रथम आपल्या गोलंदाजीनं कमाल केली. त्यानं विरोधी संघाच्या पाच फलंदाजांची विकेट घेतली. यात काही आघाडीच्या फलंदाजांचाही समावेश होता. हर्षितनं 19.3 षटकात तीन मेडन्ससह 80 धावा दिल्या आणि पाच बळी घेतले. यानंतर त्यानं संकटात सापडलेल्या दिल्लीसाठी फलंदाजी करताना आश्चर्यकारक कामगिरी केली आणि उत्कृष्ट अर्धशतक झळकावलं. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हर्षितनं 78 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 59 धावांची खेळी केली. त्यानं सातव्या विकेटसाठी 99 धावांच्या भागीदारीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्याच्या योगदानामुळे दिल्ली सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचू शकली.
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थमधून करायची आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. या कारणामुळे टीम इंडिया या सामन्यात वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू उतरवू शकते. यासाठी भारतासमोर हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांच्या रूपानं दोन पर्याय आहेत.
नितीश रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत खेळला होता. तसेच त्यानं बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेद्वारे भारतासाठी पदार्पण केलं. मात्र, आता हर्षितनं दमदार कामगिरीनं आपला दावा ठोकला आहे. आसामविरुद्ध सामन्यात हर्षितला दुसऱ्या डावात गोलंदाजी करायची आहे. जर त्यानं पुन्हा एकदा चमत्कार घडवला, तर पर्थमध्ये होणाऱ्या कसोटीसाठी तो निश्चितच प्रबळ दावेदार असेल.
हेही वाचा –
“इंग्लंडच्या फलंदाजांना अक्कल नाही”, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज भडकला
“विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं”, कामगिरी सुधारण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गंभीर कोच नसणार, या माजी खेळाडूला मिळाली टीम इंडियाची जबाबदारी