पुणे। आज(7 जानेवारी) 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवत मानाची चांदीची गदा पटकावली आहे. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी होणारा नवा पैलवान ठरला.
महाराष्ट्र केसरीचा मानकरी होण्यासाठी झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीरने शैलेश शेळकेचा 3-2च्या फरकाने पराभव केला.
या सामन्यापूर्वी काल हर्षवर्धनने गादी विभागातील अंतिम फेरीत माजी विजेत्या पुणे शहराच्या अभिजीत काटकेला 5-2 गुणांनी पराजित केले होते. तर शैलेशने माती विभागीतील चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा पराभव केला होता.
त्यामुळे यावर्षी नवा महाराष्ट्र केसरी मिळणार हे निश्चित झाले होते.
विशेष म्हणजे हे शैलेश आणि हर्षवर्धन हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचे शिष्य आहेत. त्यामुळे आज 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काका पवार यांच्या तालमीत महाराष्ट्र केसरीची गदा जाणार हे देखील पक्के होते.