2024 अंडर 19 आशिया कप 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेतील 12 वा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात 4 डिसेंबर रोजी खेळला गेला. हा सामना जिंकून भारतानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दरम्यान, या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक हरवंश सिंग दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय चाहत्यांना महान यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण आली. चाहत्यांना हरवंशमध्ये धोनीची झलक पाहायला मिळाली आहे. भारताचा अंडर-19 यष्टिरक्षक हरवंश सिंगनं धोनीच्या स्टाईलमध्ये विकेटच्या मागे आपली हुशारी दाखवली.
झालं असं की, सामन्यादरम्यान यूएईच्या फलंदाजानं मारलेला फटका भारतीय क्षेत्ररक्षकानं सीमारेषेजवळ रोखला आणि चेंडू लगेच हरवंश सिंगकडे फेकला. हरवंशने स्टंपकडे न पाहताच चेंडू स्टंपच्या दिशेनं फेकला. तोपर्यंत फलंदाज सुरक्षितपणे क्रीझमध्ये पोहोचला होता, मात्र हरवंशचा हा प्रयत्न पाहून समालोचक आणि प्रेक्षकांना धोनीच्या ऐतिहासिक ‘नो-लूक रनआउट’ची आठवण झाली. समालोचक त्याचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. एका समालोचकानं म्हटलं की, हरवंशमध्ये एमएस धोनीची झलक स्पष्टपणे दिसत आहे. ही चपळता आणि अचूकता धोनीची आठवण करून देते. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Just Indian wicketkeeper things! 🧤
Harvansh Singh channels his inner Thala magic on the field ✨#SonySportsNetwork #AsiaCup #NextGenBlue #NewHomeOfAsiaCup #UAEvIND pic.twitter.com/hmnntCqzXW
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 4, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, यूएईनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत यूएईला 138 धावांवर रोखलं. भारतानं प्रत्येक विभागात आपला दबदबा कायम राखला. यानंतर छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. आयुषनं 51 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या, तर वैभवनं 46 चेंडूत नाबाद 72 धावांची तुफानी खेळी खेळली. दोन्ही खेळाडूंनी एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. भारतानं हा सामना 10 विकेटनं सहज जिंकला.
हेही वाचा –
पदार्पण करताच नशीब चमकले; 21 वर्षाचा स्टार खेळाडू पहिल्या कसोटीनंतरच केंद्रीय करारात सामील
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर! बाबरची तिन्ही फाॅरमॅटमध्ये निवड, तर शाहीनला कसोटीतून डच्चू
सारा तेंडुलकरच्या हाती मोठी जबाबदारी, लंडनमधून शिक्षण घेऊन या फाऊंडेशनची डायरेक्टर बनली