टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले आहे. पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर महिला संघाला जरी पदक जिंकण्यात अपयश आलं असलं तरी ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला. याच यशाबद्दल दोन्ही हॉकी संघाचे सध्या कौतुक होत आहे. तसेच त्यांच्यावर बक्षीसाचाही वर्षाव होत आहे. नुकतेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिला खेळाडूंना ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, “ऑलिम्पिक महिला हॉकी संघात सहभागी असलेल्या राज्यातील नऊ खेळाडूंना हरियाणा सरकार ५०-५० लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे.” त्यांनी ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय महिला संघ कांस्यपदकाच्या लढतीत शुक्रवारी (६ ऑगस्ट) ब्रिटनकडून ३-४ ने पराभूत झाला.
हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, “ब्रिटन संघाने अगदी कमी फरकाने विजय मिळवला आहे. भारताच्या संघाने चांगली कामगिरी केली. मी हॉकी संघातील हरियाणाच्या सर्व ९ खेळाडूंना ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे.”
हरियाणा आणि पंजाबमध्ये खेळाडूंचे कुटुंब भारताच्या विजयाच्या अपेक्षेने टीव्हीसमोर बसले होते. कुरुक्षेत्राच्या शाहबादमधील राणी रामपालचे वडील म्हणाले की, संघ चांगला खेळला पण दुर्दैवाने पहिले पदक जिंकू शकले नाही. ते म्हणाले की, संघाच्या कामगिरीचा खेळावर आणि तरुणांवर सकारात्मक परिणाम होईल.
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचे वडील म्हणाले की, “राणीच्या स्वागतासाठी खूप तयारी केली जाईल. मी मुलींची ही हार मानत नाही, इथे पोहोचणे हा त्यांचा विजय आहे. ही काही छोटी गोष्ट नाही.”
भारतीय हॉकीपटू सविता पुनियाचे वडील महेंद्र पुनिया म्हणाले की, विजय आणि पराभव कोणत्याही खेळाच्या दोन बाजू असतात, आज आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागते. मी भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. त्याच बरोबर गोलरक्षक सविता पुनियाचे वडील महेंद्र पुनिया सिरसामध्ये म्हणाले, सामन्याचा निकाल काहीही असो, ते चांगले खेळले आहेत.
भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला होता, पण २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनला पराभूत करू शकला नाही. त्यामुळे कांस्य पदकही मिळवू शकले नाही. गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय पुरुष संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत करून ४१ वर्षांनंतर कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने ‘या’ खेळाडूच्या कुटुंबावर जातीवाचक टीका
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा
पीएम मोदींचा दिल्लीतून टोकियोला कॉल, निराश महिला हॉकीपटूंचा ‘या’ शब्दांत वाढवला उत्साह