भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेचा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसअखेर मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येतंय. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे चाहत्यांचंं चांगलच मनोरंजन झालं आहे. ही घटना स्टार फलंदाज विराट कोहलीशी संबंधित आहे.
झालं असं की, सामन्यादरम्यान विराट कोहलीनं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास सल्ला दिला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी हसत बोलू नको, असं कोहलीनं सिराजला सांगितलं. कोहली आणि सिराज यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला काहीतरी म्हणत असल्याचं दिसत आहे. यादरम्यान तो आणि लाबुशेन हसताना दिसले. हे पाहून विराट कोहलीनं सिराजला सांगितलं की, त्याच्याशी हसून बोलू नकोस. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Kohli to Siraj “Has kar bat nahi karna inse” 😂 pic.twitter.com/LJsVJvkfpl
— R A T N I S H (@LoyalSachinFan) December 26, 2024
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज फ्लॉपच दिसले. मात्र, दरवेळेप्रमाणे या वेळीही बुमराहनं शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले. बुमराहला साथ देणाऱ्या मोहम्मद सिराजला पहिल्या दिवशी एकही विकेट घेता आली नाही. सिराजनं पहिल्या दिवशी 15 षटके टाकली, ज्यात त्यानं 4.60 च्या इकॉनॉमीनं 69 धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर 311/6 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स नाबाद परतले. स्मिथनं 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 68 धावा केल्या आहेत. तर कर्णधार कमिन्स 1 चौकाराच्या मदतीनं 8 धावा करून खेळत आहे. मार्नस लाबुशेननं 7 चौकारांच्या मदतीनं 72 धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली.
ओपनिंगला आलेल्या 19 वर्षीय नवोदित सॅम कोन्स्टासनं 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 60 धावांची खेळी केली. त्याच्यासोबत सलामी देणाऱ्या उस्मान ख्वाजानं 6 चौकारांच्या मदतीनं 57 धावा केल्या. बुमराहनं पहिल्या दिवशी 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी 1 बळी घेतला.
हेही वाचा –
4,4,4,4,4,4….मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने ओव्हरमध्ये ठोकले सलग 6 चौकार!
भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी किती चाहते आले? संख्या जाणून विश्वासच बसणार नाही!
स्टीव्ह स्मिथची ब्रॅडमन-पाँटिंगच्या धडाकेबाज लिस्टमध्ये एंट्री, अशी कामगिरी करणारा केवळ चौथाच फलंदाज