येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती. परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाची पहिलीच लढत पाकिस्तान संघाविरुद्ध २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने भारतीय संघाला पराभूत करण्याबाबत भाष्य केले आहे.
भारत-पाकिस्तान ही लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने सामने येत आहेत.
दरम्यान या मोठ्या सामन्यापूर्वी हसन अलीने एका वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “जेव्हा आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये विजय मिळवला होता, तो आमच्यासाठी खूप चांगला काळ होता. आम्ही टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभूत करण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ. भारतीय संघाविरुद्ध खेळताना नेहमी दबाव असतोच, कारण दोन्ही देशातील चाहत्यांना आपल्या खेळाडूंकडून अपेक्षा असतात.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “इतकेच नव्हे तर ते लोक सहसा क्रिकेट सामना पाहत नाहीत. ते लोकं देखील भारत – पाकिस्तान सामना पाहत असतात. त्यामुळे आमच्यावर आणखी जास्त दबाव असतो. परंतु आम्ही आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी करू.”
तसेच हसन अलीला वाटते की, युएईमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. तर वेगवान गोलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागेल. याबाबत बोलताना तो म्हणाला, “आम्हाला माहीत आहे की, त्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची. तुम्ही पाहू शकता की,सर्व संघांनी आपल्या संघात फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे.”(Hasan Ali said wants to beat india like champions tropy final)
काही दिवसांपूर्वीच मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांनी प्रशिक्षक पदावरून माघार घेतली होती. याबाबत बोलताना हसन अली म्हणाला की, “खरं सांगायचं झालं तर मी खूप निराश आहे. विश्वचषक स्पर्धा जवळ येणार आहे आणि त्यांनी प्रशिक्षक पदावरून माघार घेतली आहे. परंतु एक खेळाडू म्हणून या गोष्टी आमच्या हातात नसतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याचा विचार करेल. आमचे काम फक्त खेळायचे आहे आणि संघासाठी जास्तीत जास्त सामने जिंकायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का?
कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ला मिळाला चँपियन, शेवटच्या चेंडूवर बाजी मारत ब्रावोचा संघ बनला विजेता