येत्या १२ ऑगस्ट पासून भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु सामन्यातील शेवटच्या दिवशी पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला होता.
या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली तर, इंग्लंड संघाकडून कर्णधार रुटला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात अशा एका फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते, जो भारतीय संघाच्या चिंतेत वाढ करू शकतो.
लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाकडून हसीब हमीद सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड संघातील सलामीवीर फलंदाज इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरत आहेत. रॉरी बर्न्सने गेल्या ११ कसोटी सामन्यात ५६८ धावा, डॉम सिब्लेने ९ कसोटी सामन्यात ३४५ आणि जॅक क्रॉलीने ७ कसोटी सामन्यात १५६ धावा केल्या आहेत. रॉरी बर्न्सला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला शतक झळकावण्यात यश आले नाही.
इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक सिल्वरवूड यांनी मुख्य क्रमात महत्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे. सिल्वरवूड यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, “हा मला वाटते की,मुख्य क्रमातील फलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी. रूटने गेल्या ६ महिन्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. परंतु, मला असे वाटते की,सहकारी फलंदाजांनी देखील धावा केल्या पाहिजे. त्यामुळे रूटवरचा भार कमी होईल.”(Haseeb hameed will be a threat to India in the lords test he scored a century in the practice match against india)
हसीब हमीद वाढवू शकतो भारतीय संघाची चिंता
हसिब हमीदने ५ वर्षांपूर्वी वयाच्या १९ व्या वर्षी राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात ३१ आणि ८२ धावांची खेळी केली होती. तो फिरकी गोलंदाजांना चांगल्या प्रकारे खेळतो. त्याने भारतीय संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४३.८० च्या सरासरीने २१९ धावा केल्या आहेत.
सराव सामन्यात झळकावले होते शतक
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघाने सिलेक्ट काउंटी इलेव्हेन संघासोबत सराव सामना खेळला होता. या सराव सामन्यात हसीब हमीदने ११२ धावांची शतकी खेळी केली होती. त्याने भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव विरुद्ध खेळताना तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली तर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
चिन्ना थाला इज बॅक! धोनी पाठोपाठ रैनाही चेन्नईत दाखल, जाणून घ्या केव्हा होणार युएईला रवाना
“… तर भारतीयांनी मला मारले असते” शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा
ताबडतोड फलंदाजी! अवघ्या २० चेंडूत ‘या’ फलंदाजाने फटकावल्या १०२ धावा, पाहा व्हिडिओ