भारतीय क्रिकेट संघातील अनेक गमतीजमतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात. कोणाचा वाढदिवस, कोणाची चेष्टामस्करी, नवीनच “चहल टीव्ही” अशा अनेक गोष्टी सतत क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळत असतात पण सोशल मीडियाच्या जमान्याआधीदेखील भारतीय संघात खूप मजेदार किस्से घडत. अशाच एका किस्स्याची पोलखोल भारताचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी (Hemang Badani) यांने केली.
हेमांग बदानी याने एकोणिस वर्षापूर्वीचा जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा इंस्टाग्रामवर सांगितला.
“२००२ ला इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कटक येथील सामन्यापूर्वी श्रीनाथ खूप निराश होता. त्याची निराशा घालवण्यासाठी सचिन तेंडुलकरने मोठी मजा केली. त्याचा पत्ता श्रीनाथला मैदानावर गेल्यावर लागला.
त्यादिवशी श्रीनाथ खूपच नर्व्हस दिसत होता. ही गोष्ट सचिनच्या लक्षात आली. मी तो सामना खेळणार नसल्याने सचिन माझ्याकडे आला आणि आम्ही श्रीनाथची मजा घेण्याचे ठरवले.”
सचिनने सांगितल्याप्रमाणे, मी सचिनची ट्राउझर (पँट) श्रीनाथच्या किटबॅगमध्ये ठेवली आणि श्रीनाथचा ट्राउझर (पँट) दुसरीकडे लपविली. आम्ही आता पुढे काय होते याची वाट पाहत होतो कारण, श्रीनाथची उंची सहा फूट दोन इंच तर सचिनची उंची पाच फूट पाच इंच होती.
थोड्यावेळाने श्रीनाथ वॉर्म अप करून आल्यावर त्याने आपली किट बॅग उघडून त्यातील तो सचिनचा ट्राऊजर घातली. त्याने अजिबात नोटीस केले नाही की आपण छोटा ट्राउझर (पँट) घातली आहे. टीम मीटिंग झाल्यावर श्रीनाथ तसाच मैदानावर गेला आणि त्याने पहिले षटक टाकले देखील.. सगळे खेळाडू त्याच्यावर हसत होते तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण छोटा ट्राऊजर घालून आलोय आणि त्यानंतर स्वतः देखील हसत ड्रेसिंग रूममध्ये येऊन त्याने स्वतःचा ट्राउझर (पँट) घातली.”
तमिळनाडूसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या हेमांग बदानी याने २००० ते २००४ या काळात भारतासाठी ४० एकदिवसीय सामने खेळले तर कसोटी कारकीर्द फक्त चार सामन्यांची राहिली. सध्या तो समालोचक म्हणून काम करतो.
हेही वाचा-
वर्ष १९८० मध्येच प्रणवदांना मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ