आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
केएल राहुलने झळकावले शानदार शतक
या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने ६९ चेंडूंचा सामना करताना तडाखेबंद नाबाद १३२ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ षटकार व १४ चौकारांचा वर्षाव केला.
कर्णधार म्हणून आयपीएल डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
याबरोबर राहुलने २०१७मध्ये हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने केलेला विक्रम मोडला आहे. डेविड वॉर्नरने आयपीएलमध्ये कर्णधार नात्याने २०१७मध्ये १२६ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. गुरुवारी राहुलने या विक्रमाला मोडीत काढत शानदार १३२ धावांची खेळी केली.
कर्णधार नात्याने आयपीएलमध्ये सर्वोच्च खेळी करणारे फलंदाज
डेविड वॉर्नरनंतर या यादीत तिसऱ्या स्थानावर विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने २०११मध्ये ११९ धावा, २०१६मध्ये विराट कोहलीने ११३ धावा तर २०१६मध्ये विराटनेच १०९ धावा केल्या होत्या. विराटने २०१६मध्ये नाबाद १०८ धावा केल्या होत्या.
२०१८पासून आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज
आयपीएलमध्ये २०१८पासून सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुल अव्वल स्थानी आला आहे. त्याने या काळात १४ अर्धशतके केली आहेत. केएलपाठोपाठ एबी डिविलियर्सने १२, रिषभ पंतने ९, शिखर धवनने ९, डेविड वॉर्नरने ९ आणि केन विलियमसनने ९ अर्धशतके केली आहेत.