चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. दोन्ही संघ सध्या आत्मविश्वासाने पूर्ण भरलेले आहेत. कारण भारताने नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे, तर इंग्लंडने श्रीलंकेला श्रीलंकेत चीतपट केले आहे. त्यामुळे आगामी भारत विरुद्ध इंग्लंड ही कसोटी मालिका देखील रंगतदार होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
आत्तापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेचा विचार करायचा झाल्यास अनेक असे फलंदाज आहेत, ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वोच्च खेळी करण्याचा मान हा ग्रॅहम गुच यांना जातो.
त्यांनी १९९० साली लॉर्ड्स येथे भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३३३ धावांची त्रिशतकी खेळी केली होती. त्यांनीं ४४५ चेंडूंचा सामना करताना तब्बल ४३ चौकार आणि ३ षटकारांसह ही त्रिशतकी खेळी साकारली होती. इंग्लंडने तो सामना २४७ धावांनी जिंकला होता. यात गुच यांच्या त्रिशतकाचे महत्त्वाचे योगदान होते.
त्यांच्याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये केवळ भारताच्या करुण नायरला त्रिशतक करता आले आहे. करुण नायरने २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. याच मालिकेत त्याने चेन्नई कसोटीत नाबाद ३०३ धावांची खेळी केली होती. त्याने हे त्रिशतक ३८१ चेंडूत पूर्ण केले होते. हे त्रिशतक भारताच्या पहिल्या डावात त्याने केले होते. त्यावेळी तो कसोटीत भारताकडून त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा दुसराच क्रिकेटपटू बनला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्रिशतके करणारे गुच आणि नायर हे दोनच फलंदाज आहेत. याशिवाय गुच आणि नायर यांच्यासह एकूण २० फलंदाजांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी किमान एकदातरी केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे फलंदाज –
३३३ धावा – ग्रॅहम गुच
३०३* धावा – करुण नायर
२९४ धावा – ऍलिस्टर कूक
२४६* धावा – जेफ बॉयकॉट
२३५ धावा – विराट कोहली
२२४ धावा – विनोद कांबळी
२२२ धावा – गुंडप्पा विश्वनाथ
२२१ धावा – सुनील गावसकर
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”
कमालीच्या फॉर्ममध्ये आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक
लवकरच पाहायला मिळणार कपिल देव यांच्या ‘८३’ सिनेमाचा थरार, ‘या’ दिवशी होणार रिलीज?