---Advertisement---

मुंबईच्या फलंदाजांनी सनरायझर्सचा उडवला धुव्वा, संघाला गाठून दिली आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या

On: शनिवार, ऑक्टोबर 9, 2021 12:49 AM
Ishan Kishan and Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझरर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात मुंबई संघाने हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमक निर्धारित २० षटकात २३५ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई संघाची ही आयपीएलमधील आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

यापूर्वी मुबंई इंडियन्सने २०१७ साली पंजाब किंग्स विरुद्ध सहा गडी गमावून २२३ धावा केल्या होत्या. ही त्यांची आयपीएल मधील सर्वोच्च धावसंख्या होती. पण हा विक्रम मोडीत निघाला आहे. याच वर्षी मुंबई संघाने आयपीएल २०२१च्या पहिल्या हंगामात त्यांनी चेन्नईविरुद्ध सहा गडी गमावून २१९ धावा केल्या होत्या. ही मुंबई संघाची तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. याआधी २०१० मध्ये मुंबई संघाने दिल्ली विरुद्ध २१८ धावांची खेळी खेळली होती.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवला. इशानने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने ५.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ १८ धावांचं होतं. रोहितला राशिद खानने बाद केले. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या अवघ्या १० धावांवर बाद झाला.

हार्दिकनंतर कायरन पोलार्ड १३ धावांचं योगदान देऊन तंबूत परतला. मात्र इशान किशनने एक टोक लावून धरत प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने देखील हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्लाबोल केला. सूर्यकुमारने ४० चेंडूत ८२ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

ईशान आणि सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या बदल्यात २३५ धावांचा डोंगर उभा केला. नंतर हैदराबाद संघ २० षटकात ८ बाद १९३ धावा करू शकला आणि मुंबईचा ४२ धावांनी विजय झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

हायवोल्टेज ड्रामा! आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक झालेले तीन अंतिम सामने

डीआरएस असता तर आणखी किती विकेट्स झाल्या असत्या? व्हि़डिओ शेअर करत वॉर्नने मारली कोपरखळी

प्ले ऑफपूर्वी चेन्नईला बसू शकतो मोठा धक्का; ‘हा’ स्टार फलंदाज होऊ शकतो स्पर्धेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---