-अक्षय आगलावे
भारतीय खेळाडूंचा हळूहळू का होईना क्रिकेट सोडून इतर खेळांमध्ये कामगिरीचा एकंदरीत दर्जा सुधारत चालला आहे. भारताने नुकत्याच झालेल्या हॉकी ज्युनिअर विश्वचषकाचे अजिंक्यपद पटकावले .बॅडमिंटन,शूटिंग, बॉक्सिंगमध्ये आपले खेळाडू ज्युनिअर सर्किट गाजवत आहेत.
यात काही भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये गेल्या अर्ध्या वर्षात 5 राष्ट्रीय विक्रम मोडले.
आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर भारतीय अॅथलेटिक्स हे पीटी उषा ,मिल्खा सिंग, अंजू बॉबी जॉर्ज, के बिनामोल ,विकास गौडा यांपुरते मर्यादित होते पण आता आपल्याकडे नीरज चोप्रा, तेजस्वीन शंकर यांसारखे प्रतिभावंत उदयोन्मुख खेळाडू आहेत. या यादीत अजून एका खेळाडूने स्थान प्राप्त केले जिने फिनलंडमधील ताम्पेरे येथे झालेल्या आयएएफ 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताला ट्रॅक प्रकारातील ऐतिहासिक असे पहिले पदक जिंकून दिले ते ही सुवर्ण पदकाच्या स्वरुपात ती म्हणजे ” हिमा दास ”
26 जूनला गुवाहाटी येथे झालेल्या आशियाई गेम्ससाठीचा पात्रता इव्हेंट म्हणजे आंतरराज्यीय अजिंक्यपद स्पर्धेत हिमाने आपला राष्ट्रकुल स्पर्धेतील रेड हॉट फॉर्म कायम ठेवत परत एकदा पर्सनल बेस्ट सुधारत 51.13 सेकंदात रेस पार करत अजिंक्यपद पटकावलं. तिची ही वेळ या वर्षातील 20 वर्षांखालील गटातील अमेरिकेच्या सिडनी मॅकनंतर दुसऱ्या क्रमांकाची जलद होती आणि तिने ही 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा स्किप केल्यामुळे हिमाची 51.13 ची वेळ आयएएफ 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपदासाठी झालेल्या प्रवेशांमध्ये सर्वात जलद होती. त्यामुळे ती ह्या रेसच्या विजेत्यापदाची ती प्रबळ दावेदार होती .एखादा/ एखादी भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार असणं ही भारतीयांसाठी खूप नवखी गोष्ट होती.
ती सुवर्ण जिंकून इतिहास घडवणार याची खात्री होती पण यावेळी कुठला आश्चर्याचा सुखद धक्का देईल याची ओढ होती ,ती काय 14वर्ष जुना मनजीत कौरचा 51.05 सेकंदचा राष्ट्रीय विक्रम मोडेल की अजून थोडस मोठं 20 वर्षांखालीलचा विश्व विक्रम मोडुन नीरज चोप्राच्या किमयेची पुनरावृत्ती करेल .तिच्याबद्दल काही सांगता येत नव्हतं कारण तिचा इथपर्यंतच्या प्रवास हा आश्चर्यांच्या धक्क्यांचा होता.
हिमाला जर तगडी स्पर्धा मिळू शकते तर ती अमेरिकेच्या 2017 ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेची विजेती टेलर मॅनसन आणि उपविजेती सायमन मॅसॉन यांच्याकडून. अपेक्षेप्रमाणे चौथ्या हिटसमध्ये धावताना 52.25 सेकंद वेळ घेत सर्व हिटसमधील स्पर्धकांपेक्षा सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि परत उपांत्य फेरीतही 52.10 सेकंदच्या सर्वोच्च वेळेसह दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
यावेळी अंतिम फेरीच्या इंट्रोडक्षणाच्यावेळी हिमाचे दरवेळी सारखा कॅरेबियन अॅथलिट्स प्रमाणे एकदम निर्भय व्यक्तिमत्व दिसून येत होते .ती चौथ्या लेनमध्ये होती तिने सुरवात थोडीशी हळू केली 300 -320 मीटर पर्यंत रोमानियन ,ऑस्ट्रेलियन, अमेरिकन स्पर्धक तिच्या पुढे होते. ती 4-5 नंबर वरती होती कारण बाकीच्या अॅथलिट्सने “early burst” घेतला होता म्हणून ती काय डगमगून गेली नाही. तिला माहिती होत आपला वेग कधी वाढवायचाय.
ती एका टेकनिकला धरून धावत होती. नंतर तिने शेवटच्या 80 मीटरपर्यंत एक्सट्रा गियर ऑन केला, ज्यावेळी बाकीच्या अॅथलिटच्या टॅंकमधील एनर्जी जवळपास संपली होती. त्यामुळे तिने सर्वांना सहजतेने पार करत रेस 51.46 सेकंदात जिंकली. अंतिम सेकंदातील समालोचकाचे हे शब्द “now hima das has lot to do ……but she is surging …she can see the finish line, she can see the history india has never won any medal in track event but das has done it here…..” (आता हिमाला भरपूर काही करावं लागणार….. पण ती आता सर्वांना पार करत आहे …तिच्या नजरेत आता फिनिश लाइन आहे ,तिला आता इतिहास दिसत आहे. भारताने आतापर्यंत कधीही कुठलेही ट्रॅकमध्ये पदक जिंकले नाही पण दासने ते आता जिंकले आहे… ) यावरून आपल्याला रेसच्या अंतिम क्षणातील रोमांचक क्षण लक्षात येतील.
रेस संपल्यानंतर बाकीचे अॅथलिट दमले असताना हिमाच्या टॅंकमध्ये अजून भरपूर एनर्जी होती. ती दोन्ही हात उंचावत सगळ्यांचे आभार मानत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. नंतर ती धावत प्रेक्षकांमध्ये असलेल्या प्रशिक्षकांकडे तिरंगा घेण्यासाठी गेली. तिथं तिने तिरंगासोबतच एक पांढऱ्या रंगाचा लाल बॉर्डर असलेला कापड घेऊन मानेभोवती गुंडाळले. त्या कापडाला गमुसा म्हणतात. या कापडाला आसामी संस्कृतीत खूप महत्व आहे .तिथं तीने भारतीय संस्कृतीसोबत आसामी संस्कृतीचेही दर्शन घडवले.
या खेळाडूला 2016 पर्यंत राष्ट्रकुल, विश्व अजिंक्यपद स्पर्धेची काय असते याची काडीमात्र कल्पना नव्हती. ती आज विश्वविजेती बनली होती. तिने अशी गोष्ट साध्य करून दाखवली होती की जी आजपर्यंत कुठल्याही भारतीयाला असाध्य होती, म्हणजे काय अद्भुत प्रवास असणार तीचा. नीरज चोप्राने ज्युनिअर लेव्हलला भालाफेकमध्ये तर अंजू बॉबी जॉर्जने सिनिअर लेव्हलला लांब उडीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले होते पण ट्रॅकमध्ये सिनियर आणि ज्युनिअर लेव्हलला वर्ल्ड स्टेजमध्ये अशी कामगिरी कुठलाच भारतीय करू शकला नव्हता. तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाला एक गोष्ट विशेष बनवते ती म्हणजे तिने ज्या 400 मी इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकले त्याची पहिली रेस तिने फक्त 5 महिन्यापूर्वी झालेल्या फेडरेशन कपमध्ये धावली होती. म्हणजे अवघ्या 5 महिन्यात तिने ही भारतीयांना आतापर्यंत असाध्य असणारी अशी गोष्ट साध्य करून दाखवली होती.
हिमा दास ही आसाममधील नायगाव जिल्ह्यातील धिंग अशा एका छोट्या गावातील माजी फुटबॉपटू शेतकरी रोनजीत आणि रोमाली दास यांच्या 5 मुलांपैकी सगळ्यात लहान आहे. तिचं लहानपणी फुटबॉलपटू बनून भारताचं प्रतिनिधित्व करायचं स्वप्न होतं. ती तिथल्या लोकल क्लबकडून स्ट्रायकर म्हणून खेळायची. पण तिला तिच्या शारीरिक शिक्षण शिकविणाऱ्या शिक्षकांनी आंतरजिल्हा स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं आणि तिने तिथे 100मी मध्ये कांस्य जिंकून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. तिथे तिच्या ट्रॅक मधील करीअरची सुरुवात झाली.
आंतरजिल्हा स्पर्धेत मिळालेल्या यशावर तिला कोईमतुरला ज्युनिअर नॅशनल्ससाठी पाठवले गेले. तिथं तिने 100 मीच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यावेळी तिचे प्रशिक्षक नवजीत मालकर आणि निपुण दास यांना तिच्यामध्ये असलेल्या प्रतिभेची खात्री पटली. कारण तिने कोणतीही तयारी न करता अंतिम फेरी गाठली होती .
त्यानंतर त्यांनी तिच्या पालकांना हिमाला प्रशिक्षणसाठी गुवाहाटीला पाठवण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी थोड्या हडबडीनंतर होकार दिला .गुवाहाटीत ट्रेनिंगमध्ये तिने आपल्या वेळेत सातत्याने सुधार केला. नंतर तिने फेब्रुवारी2017 शालेय राष्ट्रीय स्पर्धेत 100मी आणि 200मी मध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्य कमावले. या कमाईमुळे ती 18 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिने तिथेपण कांस्य आणि रौप्य पदक जिंकले. या कामगिरीच्या जोरावर ती मे महिन्यामध्ये होणाऱ्या बँकॉक आशिया युथ चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली. बँकॉकमध्ये तिथे तिने 200मीटरमधील वेळ सुधारत 24.52 सेकंद अशी वेळ नोंदवत सातवं स्थान मिळवलं. या प्रदर्शनामुळे तीची नैरोबी इथं होणाऱ्या वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी निवड झाली .तिथंही तिने परत 200मी मध्ये नवीन सुधारित 24.31 सेकंद वेळेसह सन्मानजनक पाचवं स्थान मिळवलं. या इतक्या कमी वेळेत केलेल्या उल्लेखनीय प्रदर्शनामुळे तिची निवड पतियाळा येथील सिनिअर कॅम्पसाठी झाली.
तिथं पण तीने 200मी वरतीच फोकस केला . फेब्रुवारी 2018मध्ये जकार्ता इथं झालेल्या आशियाई गेम्स टेस्ट इव्हेंटमध्ये 23.59सेकंदच्या वैयक्तिक सर्वोत्तमसह सुवर्णपदक पटकावले. हे तिच्या कारकिर्दीतील पहिलं सुवर्ण होत. बँकॉक 24.52, नैरोबी 24.31, जकार्ता 23.59 प्रत्येक स्पर्धेत तीने वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली. जी गोष्ट अन्य अॅथलिटमध्ये अभावानेच दिसते ज्यासाठी अनेक वर्षांची कडी मेहनत लागते ते तिने काही महिन्यांतच साध्य केलं होत.
तिला 200मी मध्ये समाधानकारक यश मिळालं होतं. पण तरी नॅशनल कॅम्पमध्ये प्रशिक्षकांनी हिमाला 400मी फेडरेशन कपसाठी फील्ड करायचं ठरवलं. कारण काही सिनियर खेळाडूंनी नकार दिला होता. 400 मी हा प्रकार भारतीय ट्रॅक खेळाडूंचा आवडता इव्हेंट. याच प्रकारात मिल्खा सिंग, पीटी उषा यांसारखे भारताला प्लेअर मिळाले. पण 400 मी ची शर्यत ही एक आव्हानात्मक असते यात 100 आणि 200मी रेससाठी लागणारी पॉवर आणि 800मी आणि 1500मी मध्ये लागणारी सहनशक्ती, टॅकटीक्सची आवश्यकता असते . एफआयने फेडरेशन कप राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता इव्हेंट म्हणून ठरवला होता. त्यासाठी एफआयने एकदम उच्च असे राष्ट्रीय रेकॉर्डच्या बरोबरीचे कट ऑफ ठेवले होते त्यात 400 मीटरसाठी 52.00 सेकंद कट ऑफ होता.गेल्या 1-2 वर्षात निर्मला शेरोन सोडता जवळपास कुठलीच भारतीय महिला खेळाडू 52.00 सेकंदच्या खाली वेळ नोंदवु शकली नव्हती. 400 मीटरच्या फील्डमध्ये अनुभवी आशियाई गेम्स पदक विजेती मआर पूवम्मा, यंग जिष्णा ,सोनिया बैश्या ह्या विजेतेपद जिंकण्यासाठी फेवरेट होत्या पण अंतिम फेरीमध्ये अनपेक्षित असा निकाल बघायला भेटला. आसामची रहिवासी असलेली हिमा दासने ही रेस 51.97 सेकंदासह सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन जिंकला.कारण तिने हा कारनामा तिच्या कारकिर्दीत 400 मीटरच्या पहिल्याच शर्यतीत केला आहे.
हिमा 51.97 सेकंदासह एफआयचा 52.00 सेकंदचा मार्क पारकरून राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र झाली होती .ती पहिल्यांदाच मल्टिडिसीप्लिन स्पर्धेत सहभागी झाली होती. राष्ट्रकुल स्पर्धेतील अॅथलेटिक्स स्पर्धा ही विश्वस्तरीय पातळीची असते कारण तिथे अॅथलेटिक्समध्ये प्राविण्य असणाऱ्या कॅरेबियन , आफ्रिकन, ऑस्ट्रेलिया ,न्यूझीलँड ,कॅनडा ,इंग्लंड सारख्या देशांचा समावेश असतो. अशा काठिण्य पातळीच्या स्पर्धेतही तीने अंतिम फेरीत प्रवेश केला. जिथं जवळपास सर्वच स्पर्धक कमीत कमी 2-3 वर्षांनी तरी तिच्यापेक्षा मोठे होते. फायनल मध्ये 4-5 स्पर्धक तर वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल विनर होते .तरीही तिथं तीने न डगमगता आपला अजून एकदा वैयक्तिक सर्वोच्च सुधारत 51.32 सेकंदात रेस पार केली . पीटी उषा नंतर परदेशात 400मीटरमध्ये 52 सेकंदापेक्षा कमी वेळ नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला बनली होती पीटी उषाने आपल्या 4-5 वर्षाच्या अनुभवानंतर 1984 साली कॅनबेरा वर्ल्ड कपमध्ये 52.00 सेकंदाच्या खाली म्हणजे 51.61सेकंद ही वेळ नोंदवू शकली तर ती या धिंग एक्सप्रेस हिमा दासने आपल्या 400मी कारकिर्दीच्या पहिल्याच वरिष्ठ विश्वस्तरीय स्पर्धेत नोंदवली होती ते पण अवघ्या 18 व्या वर्षी!!
तिच्या ताम्पेरेतील 51.46च्या वेळेसह आतापर्यंत तिने पाच वेळा 52.00 सेकंदच्या खाली टाइमिंग नोंदवली आहे. म्हणजे तिने अवघ्या 5 महिन्याच्या 400मी मधील कारकिर्दीमध्ये नैपुण्य मिळवलं आहे. हिमा फक्त यावेळीच ताम्पेरेमध्ये वैयक्तिक सर्वोच्च सुधारू शकली नव्हती याचे कारण तिला यावेळी हार्ड पुश करनारा कोणी खडतर प्रतिस्पर्धी नव्हता पण आशियाई गेम्समध्ये मूळच्या नायजेरिन असलेल्या बहारींनच्या 400मीटर आशियाई रेकॉर्ड होल्डर सलवा ईद नासीरचे मोठे आव्हान असेल कदाचित ती हिमाला भारताचा 14वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडायला पुश करेल.
ती फक्त आता 18 वर्षाची आहे आता वरचेवर तिच्या पायातील शक्ती वाढेल आणि टेकनीकमध्ये सुधार होऊन ती 50 सेकंदच्या खाली वेळ नोंदवून जागतिक सर्वोत्तम धावकांमध्ये गणली जाईल अशी अपेक्षा. तिने आता मिळालेल्या सुवर्णासह शौना मिलर-उइबो,नताशा हेस्टिंग्ज,ऍशली स्पेंसर, मोनिक हेंडरसन, नताल्या नाझारोवा यांसारख्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान निर्माण केलंय. हे सगळे खेळाडू ज्युनिअर चॅम्पियनपासून ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. हिमासुद्धा पुढे जाऊन हीच कामगिरी करून देशातील तरुणांसाठीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा ठेवण्यास काय वावगं ठरणार नाही.