क्रिडाविश्वात टेनिस खेळला खासकरून पाश्चात्य देशांमध्ये आमाप लोकप्रियता व प्रतिष्ठा आहे. टेनिसमधे दरवर्षी ज्या महत्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्यापैकी वर्षातील तिसऱ्या ] “द चैम्पियनशिप विंम्बलडन “अर्थातच विंम्बलडन स्पर्धेला तीन जूलै पासून लंडनमधे सुरूवात होतेय. यंदाचे विंम्बलडन स्पर्धेचे हे १४१वे वर्ष असेल.
विंम्बलडन स्पर्धेचा इतिहास खूप मोठा आहे. या स्पर्धेला ऑल इंग्लंड टेनिस क्लबने १८७७ साली सुरवात केली. विंम्बलडनच्या इतिहासातला पहिला सामना ९ जूलै १८७७ रोजी खेळला गेला तर विंम्बलडन स्पर्धेचा पहिला विजेता होण्याचा मान स्पेंसर गोर यांना मिळाला. पहिल्या विंम्बलडन स्पर्धेच्या अंतिम सामन्याला दोनशे प्रेक्षक उपस्थित होते. त्याकाळचे एक शिलिंग हे चलन मोजून प्रेक्षकांनी टिकिट खरेदी केले होते. त्यानंतर दिवसेंदिवस विंम्बलडन स्पर्धेची लोकप्रियता व प्रतिष्ठा सतत वाढतच गेली आहे.
विंम्बलडन स्पर्धा महिलांसाठी १८८४ साली खुली करण्यात आली तर मिश्र दुहेरी हा प्रकार १९१३ साली सुरू करण्यात आला.
आजपर्यंत विंम्बलडन स्पर्धेवर सतत विदेशी टेनिसपटूंचेच वर्चस्व राहीले आहे. अपवाद फक्त विलियम रेनशाँ आणि अँडी मरे.
अमेरिकेच्या पिट सँम्प्रास आणि स्वित्झर्लंडच्या राँजर फेडररने विंम्बलडन स्पर्धेचे विजेतेपद संयुक्तरीत्या सात वेळा जिंकले आहे. याच्यापैकी राँजर फेडररला आपल्या विजेतेपदच्या आकड्यामधे आणखी एकने भर घालण्याची संधी यावेळी आहे. कदाचित फेडररची शेवटची संधी असेल. त्याचे वय आणि फिटनेस पाहता तो पुढच्या वर्षी विंम्बलडनमधे सहभागी होण्याचा शक्यता कमीच आहे. जरी सहभागी झाला तरी नव्या दमाच्या खेळाडूंसमोर त्याचा टिकाव लागणं अवघडच असेल.
महिला ऐकेरीत अमेरिकेच्या मार्टीना नवरातीलोवाने विक्रमी नऊ वेळा विंम्बलडनचे विजेतेपद मिळवले आहे. तीच्या खालोखाल जर्मनीची स्टेफी ग्राफ व अमेरिकेच्या सरेना विलियम्स यांनी सात वेळा विंम्बलडन स्पर्धा जिंकली आहे.
विशेष बाब अशी की १९३६ ते २०१२ या ७७ वर्षाच्या काळात एकाही इंग्लिश टेनिसपटूंला विंम्बलडनचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. २०१३ साली अँडी मरेने विंम्बलडनचे विजेतेपद मिळवून ७७ वर्षाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
विंम्बलडन स्पर्धेचा एक वेगळाच रूबाब व प्रतिष्ठा आहे. विंम्बलडन स्पर्धेला १८७७ साली सुरवात झाली तेव्हापासून जे काही नियम व प्रथा आहेत त्याचे आजही काटेकोरपणे पालन केले जाते. खेळाडू,रेफरी आणि बाँल बाँय व गर्ल्स यांना ड्रेसकोड पाळावा लागतो. तसेच महत्वाच्या व्यक्तिंसाठी प्रेक्षकांच्यामधे बसून सामना पाहण्यासाठी राँयल बाँक्सची व्यवस्था असते. विंम्बलडन स्पर्धेच्या काळात लंडनमधे वर्षभराच्या तुलनेत स्ट्रॉबेरी व आइस्क्रीमची विक्रमी विक्री होते. कारण स्ट्रॉबेरी व आइस्क्रीमचा अस्वाद घेत विंम्बलडनचा आनंद लुटायचा ही आता प्रथाच बनली आहे.
भारतीय खेळाडूंमध्ये लिएंडर पेस (पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी ), महेश भूपती (पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी) आणि सानिया मिर्झा (महिला दुहेरी ) या प्रकारात विजेतेपद मिळविली आहेत.
यावेळी भारताचे खेळाडू मुख्यतः दुहेरीमध्ये खेळत असून त्यात रोहन बोपण्णा, लिएंडर पेस, दिवीज शरण, पुरव राजा, जीवन नेदुनचेझियान आणि सानिया मिर्झा यांचा समावेश आहे. यावेळीही भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
-आशुतोष मसगोंडे (टीम महा स्पोर्ट्स )