टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शिवाय चाहते त्याला हिटमॅन नावाने देखील संबोधतात, पण रोहित शर्मा खरच हिटमॅन राहिला आहे का? असा प्रश्न समोर येत आहे, ज्यासाठी कारणही तसे आहे. वास्तविक, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणारा खेळाडू आहे. मात्र, आयसीसीच्या अंतिम सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अपेक्षित ठरलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या कोणत्याही आयसीसी फायनलमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. शिवाय मागील वर्षी भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषकात त्याने केवळ 09 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने पहिल्यांदा 2007च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळ केला होता. त्यावेळी त्याने नाबाद 30 धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. त्यानंतर 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याला केवळ 9 धावा करता आल्या. (Hitman Rohit Sharma Records)
2014 च्या टी20 विश्वचषक फायनलमध्ये त्याने 29 धावा केल्या, पण भारताला विजेतेपद मिळवता आले नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध तो खातेही उघडू शकला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्येही त्याने खास चमक दाखवलेली नाही. 2021च्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने 34 आणि 30 धावा केल्या होत्या, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 आणि 43 धावा केल्या तर 2023 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने आक्रमक सुरुवात केली होती, पण 47 धावांवर बाद झाला. 2024च्या टी20 विश्वचषक फायनलमध्ये त्याला केवळ 9धावा करता आल्या. (Rohit Sharma ICC Finals Performance)
आयसीसी फायनल्समध्ये रोहित शर्मा
2007- 30* (टी20 वर्ल्डकप)
2013- 09 (चॅम्पियन्स ट्राॅफी)
2014- 29 (टी20 वर्ल्डकप)
2017- 00 (चॅम्पियन्स ट्राॅफी)
2021- 34, 30 (डब्ल्यूटीसी)
2023- 15, 43 (डब्ल्यूटीसी)
2023- 47 (वर्ल्डकप)
2024- 09 (टी20 वर्ल्डकप)
रोहित शर्माने अनेक वेळा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठ्या खेळी खेळल्या आहेत, पण फायनलमध्ये मात्र त्याच्या बॅटमधून मोठी खेळी निघालेली नाही. लीग व उपांत्य फेरीत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या रोहितकडून अंतिम सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा असते. 2023च्या वनडे विश्वचषक फायनलमध्ये त्याची सुरुवात दमदार होती, पण तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. 2024च्या टी20 विश्वचषक फायनलमध्येही तो झटपट बाद झाला.





