रोहित शर्मा याने बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकत टीकाकारांची बोलती बंद केली. विश्वचषक 2023मधील नवव्या सामन्यात रोहितने ठोकलेल्या एकाच शतकामुळे अनेक विक्रम रचले गेले. त्यातीलच एक विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा होय. या सामन्यात 5 षटकार मारत रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने या विक्रमात ख्रिस गेल याला मागे सोडले. या विक्रमानंतर रोहितने गेलसाठी खास विधान केले.
काय म्हणाला रोहित?
सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विचारले गेले की, त्याला माहिती आहे का की, त्याने कोणत्या व्यक्तीचा विक्रम मोडला आहे? यावर रोहितने वेळ न घालवता लगेच उत्तर दिले की, “माझा मित्र ख्रिस गेल याचा.” यानंतर त्याला गेलसाठी तो काय मेसेज देईल, असे विचारले. यावर रोहित म्हणाला, “युनिव्हर्स बॉस तर युनिव्हर्स बॉस आहे. इतक्या वर्षांमध्ये मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. आपण त्याला सिक्स-हिटिंग मशीनच्या रूपात पाहिले आहे. आम्ही दोघे एकाच नंबरची (45) जर्सी घालतो. तेव्हा 45 नंबरने हे काम केले आहे. मला माहिती आहे की, त्याला माझ्यासाठी आनंद होत असेल.”
रोहितची प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावे केल्यानंतर रोहितने मोठे विधान केले. तो म्हणाला, “मी जेव्हा हा खेळ खेळण्यास सुरुवात केली होती, तेव्हा मी विचार केला नव्हता की, मी षटकार मारू शकेल. या षटकारांची संख्या सोडा. मी कधीही विचार केला नव्हता की, मी अशाप्रकारे षटकार मारण्याची क्षमताही बाळगतो. निश्चितच ही एवढ्या वर्षांची कठोर मेहनत आहे. मी अलीकडील वर्षांमध्ये जे काही केले आहे, त्याने मी खूपच खुश आहे. मी हे काम पुढेही कायम ठेवू इच्छितो.”
रोहितचा धमाका
रोहितने अफगाणिस्तानच्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 84 चेंडूत 131 धावांची वादळी शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत एकूण 5 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. त्याच्या 5 षटकारांमुळे त्याची आंतरराष्ट्रीय षटकारांची संख्या थेट 556 झाली. ही कामगिरी त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात 473 डावांमध्ये केली. या यादीत गेल दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याने 483 सामन्यात 553 षटकार ठोकले होते. (hitman rohit sharma message to chris gayle after after breaking international sixes record)
हेही वाचा-
नवीनला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटने केले शांत, दोघांमध्ये झाली मैत्री; गंभीर म्हणाला, ‘कोहलीने…’
विराट-नवीनमध्ये झालेल्या मैत्रीबद्दल रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘आज जे काही झाले…’