मंगळवारी (२८ जून) हॉकी क्षेत्रातून शोकवार्ता पुढे आली आहे. भारताचे माजी हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी जलंधर येथे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. वरिंदर सिंग हे ऑलिंपिक आणि विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. त्यांच्या निधनानंतर हॉकी इंडियाने सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
१९७० च्या दशकात भारतीय हॉकी संघाला अनेक विलक्षण विजय मिळवून देण्यात वरिंदर सिंग यांचा मोठा वाटा राहिला होता. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते वरिंदर हे १९७५ च्या पुरुष हॉकी विश्वचषक विजेत्या संघाचा अभिन्न भाग होते. विश्वचषकात भारताने जिंकलेले हे एकमेव सुवर्ण पदक जिंकले होते. या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानला २-१ ने धूळ चारत सुवर्ण पदक पटकावले होते.
In light of the tragic passing of the great Hockey player Shri Varinder Singh, we pray to the Almighty to grant the departed person's soul eternal rest and to provide the family members the fortitude to endure this irreparable loss. 🙏🏻 pic.twitter.com/s7Jb5xH0e3
— Hockey India (@TheHockeyIndia) June 28, 2022
याखेरीज वरिंदर हे १९७२ म्यूनिख ओलिंपिकमध्ये कांस्य पदक आणि एम्सटरडममध्ये १९७३ विश्वचषकात रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचाही भाग राहिले होते. तसेच १९७४ आणि १९७८ साली आशियाई खेळांमद्ये वरिंदर यांच्या उपस्थितीत भारतीय संघाने रौप्य पदकही जिंकले होते. ते १९७५ मांट्रियल ओलिंपिकमध्येही भारताच्या हॉकी संघाचा भाग होते.