भुवनेश्वर। १४व्या हॉकी विश्वचषकात यजमान भारतीय संघाने कॅनडाला ५-१ असे पराभूत करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने १२व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर नंतरचे चार गोल भारताने चौथ्या सत्रात केले. यामध्ये चिंग्लेसना सिंग (४६व्या मिनिटाला), ललित उपाध्याय (४७व्या आणि ५७व्या मिनिटाला) आणि अमित रोहिदास (५१व्या मिनिटाला) यांनी गोल केले. तर कॅनडा कडून या सामन्यात वॅन सन फ्लोरीसने ३९व्या मिनिटाला गोल केला.
या विजयामुळे भारत क गटात सात गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवणाऱ्या बेल्जियमचेही सात गुण झाले आहे पण ते दुसऱ्या स्थानावर आहे. कारण भारताचा गोल फरक अधिक असल्याने ते पहिल्या स्थानावर कायम आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
हा सामना बचाव आणि हल्ले यांचाच होता. पहिल्या सत्रात भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यावर कॅनडाने सामना बरोबरी करण्यास हल्ले सुरू केले. मात्र ते गोलकिपर पीआर श्रीजेशने उत्तम प्रकारे रोखले.
याआधी भारताला पहिली संधी मिळाली. कर्णधार मनप्रीत सिंगने पास केलेला चेंडू नेटपाशी उभा असलेल्या दिलप्रीत सिंगकडे गेला असता कॅनडाचा गोलकिपर किंडलर अँटोनीने तो गोल होण्यापासून रोखला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला भारताला पहिली पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र कॅनडाच्या बचावापुढे भारताची परत एक संधी मुकली.
पहिला गोल झाल्यावर भारताने त्यांचे हल्ले सुरूच ठेवले. तर कॅनडा सामन्यात परतण्याचा मार्ग शोधत होती. यातच त्यांना तिसऱ्या सत्रात गोल करण्याची संधी मिळाली. भारताची बचावफळी फ्लोरीसने मोडत सामना १-१ असा बरोबरीत केला. त्याने जोन्सटन गोर्डन पास केलेला चेंडू वाॅलेस जेम्सने उत्तम प्रकारे ड्रीब करत तो फ्लोरीसच्या दिशेने पास केला. त्याने कोणतीही संधी न दवडता कॅनडाचे खाते उघडले.
आश्चर्यचकित झालेल्या भारतीय खेळाडूंनी चौथ्या सत्रात त्यांचा खेळ उंचावला. यावेळी चिंग्लेसना आणि ललित या दोघांनी एका पाठोपाठ गोल करत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या चार मिनिटांनतरच रोहितने या सामन्यात मिळालेल्या चौथ्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल करण्याची संधी साधली. तर सुमितच्या पासवर ललितने या सामन्यातील त्याचा दुसरा गोल करत संघाकडून विजयी पंच मारला.
या सामन्यात दोन गोल करणारा ललित हा सामनावीर ठरला. तसेच भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना १३ डिसेंबरला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी
–८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं
–‘डुबकी किंग’ परदीप नरवालची प्रो कबड्डीच्या विक्रमांत डुबकी