आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएलचा आगामी हंगाम भारतातच आयोजित करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. मागील हंगाम युएई येथे खेळायला गेला होता, मात्र, आयपीएल भारतात परतत असल्याने खेळाडू व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मागील हंगामाला मुकलेल्या सुरेश रैनाने सरावाला सुरुवात करताच, आक्रमक शतक ठोकून आपण चेन्नई सुपर किंग्ससाठी आगामी आयपीएल हंगाम गाजविण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
रैनाने ठोकले शतक
भारताचा माजी खेळाडू राहिलेल्या रैनाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०२० मधून माघार घेतली होती. युएईला पोहोचल्यानंतर तो तडकाफडकी भारतात परतला होता. तेव्हापासून त्याने स्पर्धात्मक क्रिकेट खेळले नाही. २० फेब्रुवारी रोजी गुरूग्राम येथे झालेल्या एका स्थानिक सामन्यात त्याने चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. रैनाने फक्त ४६ चेंडूत ११ चौकार व ७ षटकारांच्या सहाय्याने १०४ धावांची स्फोटक खेळी केली. रैनाच्या खेळीमुळे त्याच्या संघाने २३० धावांचे आव्हान लीलया पार केले.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते रैनाला
आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यामुळे रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाते. रैनाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १९३ सामने खेळताना ३३.३० च्या सरासरीने व १३७ च्या स्ट्राईक रेटने ५,३६८ धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्स व गुजरात लायन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
चेन्नई संघाचे सर्व खेळाडू आहेत फॉर्ममध्ये
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये चेन्नईच्या तीन खेळाडूंनी शतके झळकावून आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. ऋतुराज गायकवाड याने महाराष्ट्रासाठी, रॉबिन उथप्पा याने केरळसाठी तर एन जगदीशन याने तमिळनाडूसाठी शतके ठोकली आहेत. आयपीएल लिलावात चेन्नईने इंग्लंडचा मोईन अली, कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांना खरेदी करत संघाला मजबूत बनवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चौदा कोटी मिळवणाऱ्या रिचर्डसनची लिलावावेळी झाली होती ‘अशी’ अवस्था, स्वतः केला खुलासा
सीएसकेचे फलंदाज झोकात! दोन दिवसात तीन फलंदाजांनी झळकावले शतक
तेवतिया ऑन फायर!! एकदिवसापूर्वीच टीम इंडियात निवड झालेल्या राहुलची ६ षटकारासह ताबडतोड खेळी