२०१३ मधील आयपीएल (IPL) स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणानंतर श्रीसंतच्या (Sreesanth) क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लावलेला आजीवन प्रतिबंध हटवल्याने श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. केरळ क्रिकेट संघटनेने २०२० रणजी ट्रॉफीसाठीच्या (Ranji Trophy) संभावित संघामध्ये श्रीसंतचा समावेश केला आहे. इंस्टाग्रामवर नुकतेच त्याने आपण २०२१ च्या आयपीएल लिलावात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोशल मीडियावर कायम व्यस्त असणाऱ्या श्रीसंतने फेसबुकवर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो यॉर्कर चेंडूवर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीला क्लीन बोल्ड करताना दिसत आहे.
११ वर्ष जुना व्हिडिओ
श्रीसंत एक घातक गोलंदाज होता यात दुमत नाही. अजूनही त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाली नसल्याचे केरळचा कर्णधार सचिन बेबी याने मागेच स्पष्ट केले. श्रीसंतने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याद्वारे कदाचित त्याला जणू हे दाखवायचे आहे कि माझ्यामध्ये अजूनही ती आग शिल्लक आहे.
श्रीसंतने शेअर केलेला व्हिडीओ हा २००९ च्या आयपीएलमधील आहे. यामध्ये त्याने एका खतरनाक यॉर्करवर एमएस धोनीला ‘क्लीन बोल्ड’ केले होते.
https://www.facebook.com/sreesanth36/videos/223682898623211/
धोनी झाला होता हैराण
श्रीसंतने व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, ” धोनी भाई तो चेंडू पाहून हैराण झाले होते. धोनी भाईची ती इनिंग फक्त दोन रन्स टिकू शकली.”
तरीही पंजाबला पहावे लागले पराभवाचे तोंड
आम्ही सांगू इच्छितो की, त्या सामन्यात श्रीसंतने चार षटकांत २४ धावा देऊन दोन गडी बाद केले होते. तरीसुद्धा चेन्नईने पंजाबवर विजय संपादन केला. चेन्नईच्या ११६ धावांचा पाठलाग करताना पंजाब ९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि चेन्नईने २४ धावांनी विजय मिळवला. श्रीसंतने ४४ आयपीएल सामन्यात ४० बळी मिळविले आहेत.