भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली प्रमाणेच रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. आयपीएलमध्ये मात्र कर्णधार कोहलीपेक्षा रोहित कर्णधार आणि खेळाडू म्हणून आजपर्यंत सरस ठरत आला आहे.
मुंबई इंडियन्स १० पैकी ३ वेळा या स्पर्धेचे विजेते ठरले आहे आणि त्यात रोहितची कामगिरी ही कायमच उच्च राहिली आहे. या अायपीएलमध्ये म्हणूनच त्याला तब्बल १५ कोटी रुपये मिळाले आहेत.
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीपेक्षा त्याला २ कोटी कमी मिळाले असले तरी चेन्नईचा स्टार कर्णधार एमएस धोनी एवढेच पैसे त्याला मिळाले आहेत.
आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून रोहित या स्पर्धेत खेळत आला असून डेक्कन चार्जेर्स संघाकडून तो सुरूवातीचे काही मोसम खेळला होता. अगदी पहिल्या मोसमातही या खेळाडूला ४.८ कोटी रुपये लिलावात मिळाले होते. या मोसमात त्याने ४०४ धावा करताना ४ अर्धशतके केली होती.
२००९ मोसमात या खेळाडूने ३६२ धावा करताना संघाला त्या मोसमाचे विजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. त्याने २००९ला ३६२ धावा केल्या होत्या. २०१०मध्ये या खेळाडूने १६ सामन्यात ४०४ धावा करत पुन्हा एकदा आपल्याला आयपीएलमध्ये एवढी रक्कम का मोजली गेली हे दाखवून दिले.
२०११ ला रोहितला तब्बल ९.२ कोटी रुपये मोजत मुंबईने संघात घेतले. त्या मोसमात ३७२ धावा, २०१२ मध्ये ४३३ धावा तर २०१३ मध्ये ५१३ धावा करत या खेळाडूने आपल्याला मिळालेल्या मोठ्या रकमेचे चीज केले.
२०१३ मध्येच १० सामन्यांनंतर या मुंबईकर खेळाडूकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आणि रोहितने संघाला विजेतेपद मिळवून देत त्याची परतफेड केली.
२०१४ला मुंबईने लिलावात खेळाडूला द्यायची सर्वाधिक रक्कम (१२.५ कोटी) देत रोहितला संघात कायम केले. यामुळे २०१४मध्ये सर्वाधिक रक्कम देऊन संघाल कायम केलेला खेळाडू बनण्याचा मान त्याला मिळाला. याच मोसमात संघ प्ले आॅफमध्ये गेला परंतू धोनीच्या चेन्नईने संघाला घरचा रस्ता दाखवला. या मोसमात रोहितची बॅट तरीही तळपली होती. त्याने १५ सामन्यात ३९० धावा केल्या.
२०१५मध्ये पुन्हा एकदा संघाला विजेतेपद मिळवून देताना या खेळाडूने १६ सामन्यात ४८२ धावा केल्या. २०१६ला रोहितने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. या मोसमात त्याने १४ सामन्यात ४८९ धावा केल्या परंतू संघ ५व्या स्थानावर फेकला गेला.
पुन्हा २०१६मध्ये २०१५च्या चुका सुधारत रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. एक खेळाडू म्हणून ४ तर एक कर्णधार म्हणून ३ विजेतेपद जिंकणारा तो आयपीएलमधील एकमेव खेळाडू ठरला. याचमूळे मुंबई इंडियन्सने या खेळाडूला पुन्हा कर्णधार पदावर कायम ठेवताना तब्बल १५ कोटी रुपये मोजले.
कोणत्याही मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी न राहताही अायपीएलमध्ये १५९ सामन्यात १५४ डावात फलंदाजी करताना त्याने ३२.६१ च्या सरासरीने त्याने ४२०७ धावा केल्या. याचमुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सुरेश रैना (४५४०) आणि विराट कोहलीनंतर (४४१८) तिसऱ्या स्थानावर आहे.