---Advertisement---

एटीके मोहन बागानचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त, गोवाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात कसे होणार?

On: बुधवार, डिसेंबर 28, 2022 8:54 AM
ATK Mohun Bagan vs FC Goa
---Advertisement---

एटीके मोहन बागानला हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल) मध्ये बुधवारी (28 डिसेंबर) एफसी गोवाचा सामना करायचा आहे. एटीके मोहन बागाच्या घरच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ही लढत होणार आहे. मोहन बागानच्या खात्यात 20 गुण आहेत, तर एफसी गोवा 19 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

एटीके मोहन बागानला मागील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीकडून 1-0 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या स्थानी सरकता आले नाही. या निकालाने केरळा ब्लास्टर्सला तिसऱ्या स्थानावर येण्याची संधी मिळाली. केरळा ब्लास्टर्सने घरच्या मैदानावर ओडिशा एफसीचा 1-0 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले आहे.

एफसी गोवा संघावर विजय मिळवून मोहन बागानला तिसरे स्थान पटकावण्याची संधी आहे. पण, तिरी, जॉनी काऊको आणि मनवीर सिंग हे काही महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाल्यामुळे मोहन बागानची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी गोवाविरुद्धचा सामना सोपा नक्कीच नसेल. मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी तरीही संघ चांगला खेळ करेल असा विश्वास व्यक्त केला.

”हा खेळाचा भागच आहे. माझ्यासाठी हे काही नवीन नाही. या कठीण समयी मी माझ्या खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पुढील दिशेने वाटचाल करण्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे चला उभे राहा आणि प्रयत्न करत राहा,” असे फेरांडो म्हणाले.

यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने ऐबान्भा डॉहलिंग, फॅरेस अरनॉट आणि नोआ सदौई यांच्या गोलच्या जोरावर ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे याही सामन्यात एफसी गोवा तोच आत्मविश्वास घेऊन मैदानावर उतरणार आहे. मागील तीन सामन्यांत त्यांची अपराजित मालिका कायम आहे.

मोहन बागानविरुद्धचा सामना हा संघाची कसोटी पाहणारा असेल, असे मत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी व्यक्त केले. ”एटीके मोहन बागानविरुद्धचा मागील सामना हा आमच्या संघाने यंदाच्या पर्वात आतापर्यंत सर्वोत्तम खेळ केलेला सामना ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही तिच ऊर्जा घेऊन आम्ही मैदानावर उतरणार आहोत,” असा विश्वास पेना यांनी व्यक्त केला.

दोन्ही संघांची एकंदर कामगिरी चांगली झालेली आहे आणि सर्वाधिक पासेस करून ते चेंडूवर ताबा राखत आहेत. त्यामुळे उद्याचा सामना हा फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणीच असेल. एफसी गोवाने 11 सामन्यांत 4225 पासेस करत दुसरे स्थान पटकावले आहे, तर 11 सामन्यांत 3518 पासेस करणारा एटीके मोहन बागान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियन फॉरवर्ड दिमित्रि पेट्राटोस हा एटीके मोहन बागानचा स्टार आहे आणि त्याने चार गोल केले आहेत, तर5 गोलसाठी सहाय्य केले आहे. नोआ सदौईने एफसी गोवासाठी दमदार कामगिरी करताना 5 गोल व 4 गोल सहाय्य केले आहेत. हिरो आयएसएलमधील या दोन स्टारपैकी कोण वरचढ ठरतो याची उत्सुकता आहे.

हेड-टू-हेड विक्रमात एटीके मोहन बागानची बाजू वरचढ आहे. त्यांनी 3 विजय मिळवले आहेत, 1 सामना गमावला आहे, तर 1 अनिर्णित राखला आहे. या गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडे घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबाही असणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केरळा ब्लास्टर्सने पटकावले तिसरे स्थान; संदीप सिंगचा गोल ओडिशाला हरवण्यासाठी पुरेसा ठरला
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---