यजमान भारताला आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत मोठा झटका लागला आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकाच संघाला मदत करू शकते, ते कसे हे जाणून घेऊ.
या स्पर्धेच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८च्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादमध्ये झालेला हा सामना यजमानांनी ७६ धावांनी गमावला. त्यामुळे सुपर-८च्या ग्रुप-१ मध्ये मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकल्याने त्यांना दोन अंक मिळाले असून त्यांचा नेट रनरेटही बराच वाढला आहे. अशात उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यास दोन सामन्यांत विजयाबरोबर रनरेटचाही मोठा हात असणार आहे. या फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकाच भारताला मदत करू शकते.
दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा नेट रनरेट +३.८०० असा झाला असून भारताचे ० अंक आणि नेट रनरेट -३.८०० असा झाला आहे. ग्रुप-१ मध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी अद्याप एकही सुपर-८चा सामना खेळलेला नाही. तसेच भारताचे पुढील दोन सामने याच संघांविरुद्ध आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे ४ अंक होतील. त्यानंतर उपांत्य फेरीसाठी भारताला नेट रनरेटमध्ये सुधारणा करावी लागले, जी या दोन सामन्यांत विजय मिळवल्यावर होईल.
दक्षिण आफ्रिकेने त्यांचे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकले तर त्यांचे ६ अंक होतील आणि उपांत्य फेरीत पोहोचतील. भारताने त्यांचे पुढील दोन सामने जिंकले तर त्यांचे ४ अंक होतील आणि ते ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी येतील. जर अंकांची बरोबरी झाली तर नेट रनरेटने पुढे जाईल कोण हा निर्णय होणार. यावेळी भारतासाठी त्यांचा -३.८०० नेट रनरेट नुकसानदायक ठरू शकतो.
त्यामुळे भारताला आता विजयच नाहीतर मोठ्या फरकाने पुढील सामने जिंकावे लागणार आहे. असे झाले तर भारताचा नेट रनरेटही चांगला होईल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवाने काही फरक पडणार नाही.





