भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जात आहे. मात्र या सामन्यात पावसामुळे सतत व्यत्यय येतोय. पावसामुळे सामना ड्रॉ होण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर गाबा कसोटी पावसामुळे वाया गेली, तर त्याचा भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शक्यतांवर काय प्रभाव पडेल, असं प्रश्न चाहत्यांना पडतोय. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला गाबा कसोटी जिंकणं खूप महत्वाचं आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर टीम इंडियाला मालिकेतील उर्वरित दोन कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकाव्या लागतील. मालिकेचा निकाल 3-2 असा लागला तर या स्थितीतही टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान एक कसोटी जिंकावी लागेल, तरच भारताचा मार्ग मोकळा होईल.
पावसामुळे कसोटी रद्द झाली तर हे समीकरण असतील
भारतानं मेलबर्न आणि सिडनी कसोटी जिंकल्यास – भारतीय संघ इतर कोणत्याही संघाच्या निकालावर अवलंबून न राहता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलसाठी पात्र ठरेल.
भारतानं मालिका 2-1 ने जिंकली तर – श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्हाईटवॉश टाळावा लागेल.
भारतानं मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली तर – श्रीलंकेला किमान एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल.
भारतानं मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली तर – श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ड्रॉ किंवा जिंकावी लागेल.
भारतानं मालिका गमावली तर – टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. यानंतर, उभय संघांमधील पाचवा कसोटी सामना 3 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025 दरम्यान सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.
हेही वाचा –
ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?
गाबा कसोटीत रोहित शर्मानं केल्या या 3 मोठ्या चुका, कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह
जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियात जलवा, लवकरच मोडणार कपिल देवचा मोठा रेकॉर्ड