गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात रविवारी दुसऱ्या सामन्यात हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. यामुळे बाद फेरीच्या थेट शर्यतीत असलेल्या या दोन संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असला तरी निर्णायक विजयासह आघाडी वाढविण्याची त्यांची संधी हुकली. या दोन्ही संघांनी एफसी गोवा संघाला मागे टाकले, पण गोव्याचा एक सामना बाकी आहे.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. हैदराबाद व नॉर्थईस्ट युनायटेड यांची 16 सामन्यांतून पाच विजय, आठ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह 23 गुण अशी समान कामगिरी आहे. यात हैदराबादचा 4 (20-16) गोलफरक नॉर्थईस्ट युनायटेडच्या 1 (21-20) पेक्षा सरस ठरला. हैदराबाद तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट युनायटेड चौथ्या क्रमांकावर आहे. गोव्याचे 15 सामन्यांतून 22 गुण आहेत.
या लढतीत दोन्ही संघांनी प्रयत्न केले, पण त्यांना अखेरपर्यंत संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. नवव्या मिनिटाला हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याने डावीकडून चाल रचली, पण प्रतीस्पर्धी बचावपटू नीम दोर्जी याला चकविले आणि गोलक्षेत्रात क्रॉस शॉट मारला, पण सहकाऱ्यांच्या स्थितीचा अंदाज न घेतल्यामुळे ही चाल अपयशी ठरली.
त्यानंतर 12व्या मिनिटाला नर्झारीने डावीकडून पुन्हा मुसंडी मारली आणि उजव्या पायाने क्रॉस शॉट मारला, पण नॉर्थईस्ट युनायटेडचा बचावपटू डायलन फॉक्स याने हेडिंगवर चेंडू थोपवला. त्यावेळी हैदराबादचा स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने प्रयत्न केला, पण त्याला पुरेसा वाव नव्हता.
16व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडला मिळालेली फ्री किक मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगो याने घेतली. लांबून धावत येत त्याने फटका मारला, पण जास्त ताकद लावल्यामुळे चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.
24व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडला आणखी एक डावीकडे फ्री किक मिळाली. स्ट्रायकर लुईस मॅचादो याने चेंडू मारल्यानंतर चेंडू मध्यरक्षक लालेंगमाविया याने नेटच्यादिशेने हेडिंग केले, पण चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्याकडे गेला.
34व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडचा बचावपटू बेंजामीन लँबोट याने आगेकूच करीत स्ट्रायकर निंथोईंगांबा मितेई याच्या साथीत चाल रचली, पण त्याने मारलेला फटका नेटच्या बाहेरील बाजूला लागला.
दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला हैदराबादला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक महंमद यासीर याने घेतला, पण त्याचा चेंडू सहज अडविला गेला. 55व्या मिनिटाला सँटानाने डाव्या बाजूने आगेकूच केली. त्याने बचावपटू आकाश मिश्रा याला पास दिला, पण आकाशचा फटका स्वैर होता.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
आयएसएल २०२०-२१ : बेंगळुरू-चेन्नईयीनमध्ये गोलशून्य बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीची पिछाडीवरून ब्लास्टर्सवर मात