आयपीएल ‘प्ले ऑफ’ मधील एलिमिनेटर सामन्यात शुक्रवारी(5 नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयासह हैदराबादने ‘क्वालिफायर 2’ मध्ये प्रवेश केला आहे. मात्र बेंगलोरचा संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यामुळे बेंगलोरची विजेतेपद मिळवण्याची प्रतिक्षा आणखी लांबली आहे. पण हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या एक पाऊल पुढे सरकले आहेत.
शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत बेंगलोरने 7 गडी गमावून 131 धावा केल्या. त्यानंतर हैदराबादने 6 गडी राखून बेंगलोरने दिलेले 132 धावांचे आव्हान 19.4 षटकात पूर्ण केले. हैदराबादच्या या विजयात 5 खेळाडूंनी अंत्यत महत्त्वाचे योगदान दिले. त्या 5 खेळाडूंचा या लेखात आढावा घेऊ.
1. जेसन होल्डर
बेंगलोर विरुद्ध झालेल्या सामन्यात जेसन होल्डर हा बेंगलोरसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला आहे. बेंगलोरकडून प्रथम फलंदाजीला उतरलेले सलामीवीर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल या दोघांनाही त्याने सुरुवातीलाच बाद करून बेंगलोरला दबावात आणले. पुढे त्याने शिवम दुबेला ही बाद केले. त्याने 4 षटकांत 25 धावा देत 3 बळी घेतले. गोलंदाजीचं नव्हे तर त्याने फलंदाजी करून देखील संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या 4 चेंडूत 8 धावा हव्या असताना 2 चौकार मारून त्याने संघाला ‘क्वालिफायर 2’ मध्ये पोहोचवले. होल्डरने 20 चेंडूत 3 चौकरांसह नाबाद 24 धावा करीत अष्टपैलू खेळ साकारला. तसेच केन विलियम्सनबरोबर 65 धावांची नाबाद भागीदारीही त्याने केली.
2. टी नटराजन
थंगारासु नटराजनने बेंगलोरकडून टिकून खेळणाऱ्या एबी डिविलियर्स ला 56 धावांवर त्रिफळाचीत केले. डिविलियर्सने आरसीबी संघाला कठीण परिस्थितीतुन बाहेर काढले होते. मात्र शेवटच्या षटकांत धुव्वादार खेळी करण्यापूर्वीच अगदी योग्य वेळी नटराजनने त्याला बाद केले. नटराजनने वॉशिंग्टन सुंदरला ही तग धरू दिला नाही. या सामन्यात 4 षटकांत 33 धावा देत 2 बळी नटराजनने घेतले.
3. शाहबाज नदीम
बेंगलोरने 15 धावांवर 2 गडी गमावल्यानंतर ऍरॉन फिंच आणि डिविलियर्समध्ये चांगली भागेदारी व्हायला लागली होती. या दोघांकडून जोडल्या जाणाऱ्या धावा हैदराबादसाठी त्रासदायक ठरणार होत्या. मात्र अशा परिस्थितीत शहबाज नदीमने फिंच ला बाद करून भागीदारी तोडली. नदीमने 4 षटकांत 30 धावा देत 1 बळी घेतला.
4. केन विलियम्सन
हैदराबादचा माजी कर्णधार केन विलियम्सनने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यात आपले मोठे योगदान दिले आहे. धावांचा पाठलाग करताना एका बाजूने गडी बाद होत असताना दुसरी बाजू विलियम्सनने सांभाळून धरली होती. विलियम्सनने 44 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार ठोकून नाबाद 50 धावा केल्या. यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
5. मनीष पांडे
मनीष पांडेने 21 चेंडूत 3 चौकार व एका षटकारासह 24 धावा केल्या. पांडेने एक छोटी खेळी केली असली तरी धावांचा पाठलाग करताना त्याने दिलेले योगदान हे महत्वपूर्ण होते. गोस्वामी बाद झाल्यानंतर पांडेने संघाला सावरत खेळ काहीसा पुढे नेऊन ठेवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
योग आले जुळून! हैदराबाद जिंकणार आयपीएलचा किताब? पाहा काय आहे कारण
वॉर्नरने RCB विरुद्ध केवळ १७ धावा करुनही मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम
“थँक्यू विराट”, हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे विराटची ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा