हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बुधवारी येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर हैदराबाद एफसीची नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. घरच्या मैदानावरील विजयानंतर आपले दैव खरोखरच पालटले आहे हे निश्चीत करण्यासाठी हैदराबाद आपली मोहिम पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील.
मोसमाला त्यांचा प्रारंभ खराब झाला होता. त्यामुळे निर्माण झालेली सारी नकारात्मकता मागील सामन्यानंतर दूर झाली. केरला ब्लास्टर्सला त्यांनी पिछाडीवरून 2-1 असे हरविले. फिल ब्राऊन यांच्या संघाला पहिल्या दोन सामन्यांत मोठे पराभव पत्करावे लागले होते. त्यानंतर घरच्या मैदानावर त्यांना थोडा दिलासा मिळाला.
आता या निकालावर पायाभरणी करण्याचा आणि संघाचे मनोधैर्य उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यानंतरही ब्राऊन यांच्यासमोर कडवे आव्हान असेल. त्यांचे प्रमुख खेळाडू दुखापती किंवा निलंबनामुळे अजूनही बाहेर आहेत. बोबो, रॅफेल गोमेझ, गाईल्स बार्स्न्स यांना दुखापत झाली आहे, तर नेस्टर गॉर्डीलीओवर निलंबनामुळे बंदी आहे.
ब्राऊन म्हणाले की, सर्व दुखापतींमधून आम्ही सावरलो आहोत असे वाटत नाही. चार प्रमुख खेळाडू अजूनही जायबंदी आहेत. अशावेळी आमच्याकडे जे आहे त्यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करण्याकडे आमचा कल आहे. उपलब्ध खेळाडूंवरच आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ती सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती.
मार्सेलिनियोचा फॉर्म ही हैदराबादसाठी चमकदार बाब ठरली आहे. ब्राझीलच्या या फॉरवर्डने ब्लास्टर्सविरुद्ध फ्री किकवर केलेला गोल निर्णायक ठरला. जमशेदपूर एफसीविरुद्ध 1-3 अशा पराभवातही एक गोल त्याचा होता. नॉर्थईस्टविरुद्ध तो हैदराबादचा आधारस्तंभ असेल.
आसामोह ग्यान आणि मार्टिन चॅव्हेज यांच्या नेतृत्वाखालील नॉर्थईस्टचा भेदक बचाव हैदराबादच्या बचाव फळीसमोर मोठा धोका निर्माण करेल. हैदराबादला अद्याप मोसमात एकही गोल न स्विकारता क्लीन शीट राखण्याची कामगिरी करता आलेली नाही. रेडीम ट्लांग यानेही प्रभाव पाडला आहे आणि त्यामुळे नॉर्थईस्टच्या आक्रमणाचा वेग वाढला आहे.
ब्राऊन यांनी सांगितले की, एका भक्कम संघाविरुद्ध गाठ पडणार असल्याची आम्हाला कल्पना आहे. त्यांच्या संघात बरीच शिस्त आहे. त्यांचा बचाव संघटित आहे. त्यांच्याकडे ग्यानसारखा सामने एकहाती जिंकून देण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे, पण आमच्याकडे जिगर असलेला संघ आहे.
नॉर्थईस्ट तीन सामन्यांत अद्याप अपराजित आहे. त्यांना एकच विजय मिळाला असला तरी दोन बरोबरी बेंगळुरू एफसी आणि एफसी गोवा अशा संघांविरुद्ध झाल्या आहेत.
खरे तर गोव्याविरुद्ध पूर्ण तीन गुण न मिळणे दुर्दैवी ठरल्याची भावना रॉबर्ट जार्नी यांच्या संघात निर्माण झाली असेल. तेव्हा त्यांना भरपाई वेळेत गोव्याच्या गोलमुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
जार्नी म्हणाले की, हैदराबादचा संघ कसा खेळेले हे तुम्हाला कदापी कळणार नाही. त्यांनी मागील सामना जिंकला. त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, पण त्यांच्याविरुद्ध आम्हाला पूर्वतयारी करावी लागेल. आमचाही आत्मविश्वास उंचावला आहे, कारण आम्ही अजून अपराजित आहोत. आम्ही लीगमधील प्रमुख प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळलो आहोत. हा सामना प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर असल्यामुळे आव्हान कडवे असेल.
नॉर्थईस्टचे पारडे जड मानायचे की हैदराबाद आपली धमक दाखवून देणार या उत्सुकतेमुळे ही लढत चुरशीची ठरेल.