ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल नुकतेच एक महत्वपूर्ण विधान केले. मॅक्सवेलच्या मते त्याची कसोटी कारकिर्द संपुष्टात आल्यात जमा असून आता त्याने फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. मॅक्सवेलची नजर आगामी तीन वर्षांत होणाऱ्या तीन जागतिक विश्वचषक स्पर्धांवर आहे. मॅक्सवेल हेराल्ड सन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
“मी कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाच्या जवळपास देखील नाही”
ग्लेन मॅक्सवेलने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधींचा त्याला फारसा लाभ उठवता आला नाही. मॅक्सवेलने आपला शेवटचा कसोटी सामना २०१७ साली बांग्लादेशविरुद्ध खेळला होता. त्यामुळे सध्याची ऑस्ट्रेलियन संघाची स्थिती पाहता कसोटी क्रिकेटमधील मॅक्सवेलच्या पुनरागमनाबाबत विचारले असता तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर मी सध्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाच्या जवळपास देखील नाही.”
तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला कशाची गरज आहे, हे त्यांनाच व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. कॅमरून ग्रीनसारखा भविष्यातील सुपरस्टार आहे. तसेच युवा विल पुकोवस्की आहे. ४०पेक्षा अधिक सरासरी असलेला ट्रॅविस हेड देखील आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय म्हणून अनेक चांगले खेळाडू उपलब्ध आहेत.”
मॅक्सवेलने आगामी विश्वचषकात आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. २०२१ आणि २०२२ साली होणारा टी-२० विश्वचषक तसेच २०२३ साली होणारा वनडे विश्वचषक आपल्या रडारवर असल्याचे मॅक्सवेल यावेळी म्हणाला.
महत्वाच्या बातम्या:
टीम इंडिया तयारीत राहा; कसोटी मालिकेसाठी दिग्गजाने इंग्लंड संघाला दिलाय हा गुरु मंत्र
इंग्लंडकडून ७४५ खेळाडू खेळले पण असा विक्रम करणारा जो रुट दुसराच क्रिकेटपटू






