कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या भारताबरोबरच जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक प्रमाणात ऍक्टिव्ह असल्याचे दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटू इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट सेशनही करत आहेत.
असेच आज(८ मे) सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट सेशन झाले. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच वॉर्नरने रोहितला त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकबद्दलही आठवण करुन दिली.
रोहितने २००९ च्या आयपीएल मोसमात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना हॅट्रिक घेतली होती. त्यावेळी त्याने अभिषेक नायर, हरभजन सिंग यांना १६ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बाद केले होते. तर १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेपी ड्यूमिनीला बाद केले होते आणि हॅट्रिक साजरी केली होती.
या हॅट्रिकच्या आठवणीबद्दल रोहित वॉर्नरशी बोलताना म्हटला, ‘अरे मला विश्वासच बसत नाही की मी डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. मला लक्षातही नाही मी तेव्हा कशी गोलंदाजी केली होती. मला बोटाची दुखापत झाली त्यानंतर मी चेंडू नीट पकडू शकत नाही आणि या दिवसात गोलंदाजीपासून लांब रहाणेच चांगले आहे.’
‘जर मी आत्ता विचार केला की मी हॅट्रिक घेतली होती तर मला फार विचित्र वाटत आहे आणि ते चांगले फलंदाज होते. मला आठवतयं जेपी ड्यूमिनी, अभिषेक नायर आणि हरभजन सिंग हेे फलंदाज होते. मला खात्री आहे हरभजनने मला कमी लेखत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्रिफळाचीत झाला.’
रोहितने जेव्हा ही हॅट्रिक घेतली होती तेव्हा तो केवळ २२ वर्षे ६ दिवस एवढे वय होते. त्यामुळे तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला होता. हा विक्रम २०१९ आयपीएलपर्यंत अबाधित होता. पण २०१९ ला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सॅम करनने हॅट्रिक घेत हा विक्रम मोडला. करनने हॅट्रिक घेतली तेव्हा तो २० वर्षे ३०२ दिवस एवढे होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
डेविड वॉर्नरने निवडला सार्वकालिक आयपीएल संघ पण ‘या’ २ दिग्गज क्रिकेटपटूंना नाही दिले स्थान
कसोटी चॅम्पियनशीपऐवजी घ्या ऍशस आणि भारत-पाकिस्तान कसोटी मालिका, या क्रिकेटरचा सल्ला
विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरलेल्या या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केली खांद्याची सर्जरी