भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हाही दिग्गज सलामीवीर फलंदाजांचा विषय निघेल तेव्हा तेव्हा विरेंद्र सेहवागचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. सेहवागने आपल्या कारकिर्दीत सलामीला खेळताना अनेक मोठे विक्रम रचले आहेत. पण सेहवागने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. पण, नंतर त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यावेळचा कर्णधार सौरव गांगुलीने त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यही ठरला. पण हा निर्णय घेण्यामागची कल्पना मात्र, वेगवान गोलंदाज झहीर खानची होती.
याबाबतचा खुलासा सेहवागने पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध कार्यक्रम ‘दादागिरी अनलिमिटेड’मध्ये केला होता. या शोचे निवेदन स्वत: गांगुली करायचा. त्याने या शोमध्ये एकदा भारताचे विरेंद्र सेहवागसह हरभजन सिंग, आर अश्विन, झहीर खान, मोहम्मद कैफ, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना अमंत्रित केले होते.
या शोमध्ये बोलताना सेहवागने गांगुलीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सांगितले होते की ‘साल १९९९ पासून २००० पर्यंत मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो होतो आणि धावा केल्या होत्या. जेव्हा मी संघात पुनरागमन केले तेव्हा माझा कर्णधार सौरव गांगुली होता आणि त्याने माझी निवड केली होती. त्याने मला खूप संधीही दिल्या. १५-२० डावात तर धावाच झाल्या नव्हत्या, तरीही त्याने मला पाठिंबा दिला. याचे सर्व श्रेय गांगुलीला जाते. मला वाटते की जर इतक्या संधी मिळाल्या नसत्या, तर मी इतका मोठा खेळाडू झालो नसतो.’
तसेच कारकिर्दी सलामीला फलंदाजीची संधी मिळण्याबाबत सेहवाग म्हणाला, ‘याचे श्रेय सौरव गांगुला जाते. मी यासाठी झहीरचेही आभार मानू इच्छितो. त्याकाळी श्रीलंकेत अनेक जणांना सलामीला संधी दिली होती, ज्यात युवराज सिंग, हमांग बदानी, अमय खुरासिया अशा फलंदाजांचा समावेश होता. त्यांच्याकडून धावा झाल्या नाहीत. त्यानंतर झहीर खानने दादाला अप्रोच केले की सेहवागलाही सलामीला पाठवा. तेव्हा मी झहीर खानला शिव्या देत होतो की तू मला सलामीवीर बनवले. पण आज या स्टेजवर मी दोघांनाही धन्यवाद म्हणतो की मी जर सलामीला फलंदाजी केली नसती तर कदाचीत मी इतक्या धावा करु शकलो नसतो.’
सलामीवीर म्हणून सेहवाग सरस
सेहवागने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३७४ सामन्यांत ४०.३१ च्या सरासरीने १७२५३ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ३८ शतकांचा आणि ७२ अर्धशतकांचा सामावेश आहे. तसेच त्याने ३३२ सामन्यांत सलामीला फलंदाजी केली असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने सलामीला ४१.५४ सरासरीने ३६ शतकं आणि ६७ अर्धशतकांसह १६११९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-भारत मालिकेच्या पहिल्या सामन्यातून आणखी एक क्रिकेटपटू बाहेर
जेव्हा गावस्कर म्हणाले होते, ‘ए चल फूट…’, थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत वीरूकडून बड्डेच्या हटके शुभेच्छा