गुरुवारी (१६ डिसेंबर) भारतीय क्रिकेट संघ (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India’s South Africa tour) जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाला ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. पण, या दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनेक बदल नेतृत्त्वगटात केले आहेत. आता याबद्दल भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने खुलासे केले आहेत.
बीसीसीआयने या दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना विराटला कर्णधारपदी कायम ठेवत, रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कसोटी संघाचा उपकर्णधार केल्याचे सांगितले होते. याशिवाय बीसीसीआयने विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे वनडे संघाचे कर्णधारपदही रोहित शर्माला देण्यात आले आहे. तसेच विराटने काही दिवसांपूर्वीच टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे टी२० संघाचे कर्णधारपदही सध्या रोहितकडे आहे, तर विराट केवळ कसोटी संघाचा कर्णधार आहे.
या नेतृत्त्वबदलाबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात बरिच चर्चा झाली. आता विराट कोहलीनेच वनडे कर्णधार बदलण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही – विराट कोहली
वनडे कर्णधारपदावरुन काढल्याबद्दल विराट म्हणाला, ‘मला कसोटी संघाची निवड होण्याच्या दीडतासापूर्वी संपर्क करण्यात आला. माझ्याशी मुख्य निवडकर्त्यांनी कसोटी संघाबद्दल चर्चा केली. त्यावेळी, मला शेवटी सांगितले की मी वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे आणि मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. पण, या निर्णयाबद्दल माझ्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.’
तसेच विराटने कर्णधारपदाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी जेव्हा बीसीसीआयला टी२० कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितले होते, तेव्हा त्याचा खूप चांगल्याप्रकारे स्वीकार करण्यात आला होता. त्यात कुठल्याच प्रकारचा संकोच नव्हता. हे खूप प्रगतीशील पाऊल होते. त्यावेळी मी सांगितले होते, की मी वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्त्व करणार आहे. माझ्याकडून संवाद खूप स्पष्ट होता. पण, त्याचवेळी मी हे देखील स्पष्ट केले होते की, जर अधिकाऱ्यांना आणि निवडकर्त्यांना वाटत असेल की मी बाकी प्रकारात नेतृत्त्व करू नये, तर माझी काही तक्रार नव्हती.’
याबरोबरच विराटने हे देखील स्पष्ट केले की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा, पण वनडे कॅप्टन्सीबद्दल केले धक्कादायक खुलासे
अरर! दुसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी कर्णधार रुटला स्टोक्सनेच केले असते दुखापतग्रस्त, पाहा नक्की काय झाले
अरे बापरे! फलंदाजाने इतका जोरदार षटकार मारला की, प्रेक्षकाचे फुटले डोके, पाहा व्हिडिओ