क्रिकेटचे मूळ रूप म्हणजे कसोटी क्रिकेट होय. क्रिकेटच्या या सर्वात जुन्या प्रकारात खेळाडूंचा खऱ्या अर्थाने कस लागतो. आजही टी२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेट आवडीने पाहणारे अनेक चाहते दिसून येतात. नव्या पिढीतील बरेच फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ही आक्रमक फटकेबाजी करू लागले आहेत. भारताचा युवा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत या खेळाडूंपैकी एक आहे. नुकतेच इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या एका वेगवान गोलंदाजाने त्याचे कौतुक करताना, आपण फक्त रिषभची फलंदाजी पाहण्यासाठी कसोटी क्रिकेट पाहतो असे म्हटले आहे.
या खेळाडूने केले कौतुक
भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहे. आपल्या लहानशा कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला बरेच सामने एकहाती जिंकून दिले आहेत. त्याच्या याच बेधडक अंदाजाची भुरळ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याला पडली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने पंतची प्रशंसा केली.
मिल्स म्हणाला, “मी केवळ टी२० क्रिकेट खेळतो. दुखापतीमुळे मी दीर्घकाळ चालणारे चार दिवसीय सामने खेळू शकत नाही. त्याचबरोबर, मला परंपरागत कसोटी क्रिकेट पहायला देखील आवडत नाही. मात्र, ज्यावेळी भारताचा रिषभ पंत फलंदाजी करत असतो त्यावेळी मी आवर्जून कसोटी सामना पाहतो. त्याचा खेळ पाहणे रोमांचकारी असते. रिषभ म्हणजे बॉक्स ऑफिस आहे त्यासाठी तुम्ही आपला टीव्ही चालू करता.”
मिल्सने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील झालेल्या कसोटी मालिकेविषयी बोलताना म्हटले, “त्याने इंग्लंड विरुद्ध काही अप्रतिम खेळ्या केल्या आहेत. ज्या खरेच पाहण्यासारख्या होत्या. मला मनोरंजनात्मक क्रिकेट पाहायला आवडते. एवढेच काय तर अहमदाबाद कसोटीत प्रत्येक चेंडू वळत असताना काहीतरी घडणार असे वाटायचे. वैयक्तिकरित्या मला ती मालिका खूप आवडलेली.”
तीन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा पंत खराब कामगिरीमुळे संघाबाहेर गेला होता. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटीतून त्याने पुनरागमन केले व भारताचा प्रमुख मॅचविनर म्हणून समोर आला.
ऑस्ट्रेलिया दौरा व इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवली
रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात व ब्रिस्बेन कसोटी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही तो रोहित शर्मानंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलेला. तो सध्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानी असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राखीव दिवस ते रिव्ह्यू, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ‘असे’ आहेत आयसीसीचे नियम व अटी
क्या बात! केवळ १२ महिन्यात ‘या’ महिला खेळाडूने कमावलेत तब्बल ४०२ कोटी रुपये
‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’