विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यावरील खेळलेल्या चार कसोटींपैकी दोन सामने जिंकत यजमान इंग्लंडला नामोहरम केले. त्यानंतर, जगभरातील सर्व आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे कौतुक करताना दिसून येत आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व क्रिकेट समीक्षक इयान चॅपेल यांनीदेखील भारतीय संघाचे गुणगान गाताना इतर संघांना चेतावणी दिली आहे.
भारतीय संघात सुधारणेला वाव
भारतीय संघाने लॉर्ड्स व ओव्हल कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, पाचवा सामना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. भारतीय संघाच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या इयान चॅपेल यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले,
“यामध्ये काही शंका नाही की, भारताचा संघ एक अष्टपैलू संघ आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया सलग दोनदा मालिकाविजय मिळवला. आता इंग्लंडमध्ये देखील आपली प्रतिमा दाखवली. मायदेशात ते नेहमीच मजबूत असतात. ही अन्य संघांसाठी चिंतेची बाब आहे की, भारताच्या सर्वोत्तम संघात अजूनही सुधारणेला वाव आहे.”
अश्विनची संघात जागा बनते
चॅपेल यांनी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला संघात जागा देण्याविषयी बोलताना म्हटले,
“अश्विन भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू आहे. त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली होती. माझ्यामते, अश्विनची संघात जागा बनवायला हवी. रिषभ पंतसोबत तो उजव्या-डाव्याने फलंदाजी करताना उत्तम ताळमेळ साधू शकतो.”
इयान चॅपेल यांनी या मुलाखतीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाचे व युवा अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांचे देखील विशेष कौतुक केले.
भारताची शानदार कामगिरी
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट सांघिक कामगिरीचा नमुना सादर केला. रोहित शर्मा व केएल राहुल या सलामीवीरांनी प्रत्येकी एक शतक साजरे केले. मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांनी काही प्रमाणात भारतीय संघाचा डाव सावरला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज या वेगवान तिकडीने नेहमी इंग्लिश फलंदाजांना जखडून ठेवले. शार्दुल ठाकुरने चौथ्या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतके झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली.