आयसीसी 2024 महिला टी20 विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. आयसीसीनं महिला टी20 विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. याशिवाय ऑनलाइन बुकिंग देखील सुरू केलं आहे. परंतु यातल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाच्या सामन्याच्या तिकिटांच्या किमती जाणून तुम्हाला धक्काच बसेल!
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ 6 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता भिडतील. याच मैदानावर संध्याकाळी वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होणार आहे. अशा परिस्थितीत आयसीसीनं दोन्ही सामन्यांचे तिकीट जारी केले.
सामन्याच्या सर्वात कमी किमतीचं तिकीट फक्त 15 दिरहम आहे. भारतीय रुपयात ही किंमत अंदाजे 342 रुपये होते. मात्र वेगवेगळ्या स्टँडच्या तिकिटांच्या किमती वेगवेगळ्या आहेत, जे 25 दिरहम म्हणजे अंदाजे 570 भारतीय रुपये आहेत. तुम्ही t20worldcup.platinumlist.net या वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी तिकिटाची गरज नाही.
महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या 10 संघांची प्रत्येकी 5 च्या दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आलीये. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आलं आहे. या गटात भारताशिवाय न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत. टी20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान 15 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारतीय संघानं 12 सामने जिंकले, तर 3 सामन्यात पराभव पत्कारावा लागला. टी20 विश्वचषक 2023 मध्ये भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता.
हेही वाचा –
अश्विन आणि कोहलीच्या पगारात चक्क इतकं फरक! कसोटीसाठी दोन्ही दिग्गजांना किती पैसे मिळतात?
राशिद खाननं केला वयाचा घोटाळा? अफगाणिस्तानच्या कर्णधारानं सांगितलं खरं वय
MI, RCB पासून CSK पर्यंत…प्रत्येक संघ कोणत्या 5 खेळाडूंना रिटेन करू शकतात; वाचा यादी






