कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक सामन्यात एकमेकांशी भिडतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना खेळला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची नुकतीच घोषणा केली. विशेष म्हणजे सामन्यासाठीचे चारही पंच आणि सामनाधिकारी हे इंग्लंडचेच असतील.
हे असतील पंच आणि सामनाधिकारी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी चार पंच व सामनाधिकारी यांची घोषणा केली. या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ व मायकेल गॉफ काम पाहतील. तिसरे पंच म्हणून रिचर्ड केटलब्रो तर, चौथे पंच म्हणून ऍलेक्स वार्फ यांची निवड झाली आहे. या सामन्याचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड असतील.
रिचर्ड इलिंगवर्थ यांनी आतापर्यंत ७४ तर, मायकेल गॉफ यांनी २७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. रिचर्ड केटलब्रो यांना ९४ सामन्यांमध्ये पंचगिरीचा अनुभव असून, त्यापैकी ६९ वेळा ते मैदानी पंच आणि २५ वेळा तिसरे पंच म्हणून सहभागी झाले आहे. चौथे पंच वार्फ यांनी सात वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी सामनाधिकारी म्हणून ओळखले जाणारे ख्रिस ब्रॉड यांनी १०७ सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
कोरोनामुळे एकाच देशाचे पंच
आयसीसीचे वरिष्ठ संचालक ऍड्रियन ग्रिफिथ यांनी या निवडीविषयी बोलताना म्हटले की, “कोरोना काळात या महत्वपूर्ण सामन्याचे आयोजन होत आहे. आम्ही या सामन्यासाठी अनुभवी पंचांची निवड करू इच्छित होतो. मात्र, सद्यपरिस्थितीत इतर देशाहून पंच येणे शक्य नाही. सुदैवाने आम्हाला इंग्लंडमध्ये सर्वोत्तम पंच लाभले. या सर्वांना या सामन्यासाठी शुभेच्छा.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून पाकिस्तानचे अलीम दार, श्रीलंकेचे कुमार धर्मसेना अथवा तिसरे पंच म्हणून निवड झालेले रिचर्ड केटलब्रो काम करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
महत्वाच्या बातम्या:
विंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, अजून एका भावंडांच्या जोडीचीही निवड
या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक