आयसीसीने सोमवारी(२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांवर भारत-ऑस्ट्रलियन क्रिकेटपटूंचे वर्चस्व राहिले आहे. आयसीसीच्या एकूण १० पुरस्कारांपैकी ७ पुरस्कार भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी पटकावले आहेत.
या पुरस्कारांसाठी खेळाडूंची १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीतील कामगिरी लक्षात घेण्यात आली असून यासाठी चाहत्यांनी मते देखील लक्षात घेण्यात आली आहेत.
या कालावधीतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार भारताचा कर्णधार विराट कोहलीला जाहीर झाला आहे. त्याने या कालावधीत ६६ शतकांसह २० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय त्याला सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कराच्या कालावधीत १० हजारांहून अधिक वनडे धावा करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार अफगाणिस्तानच्या राशिद खानला मिळाला आहे.
याव्यतिरिक्त सहसदस्य देशांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार स्कॉटलंडच्या काईल कोएत्झरला मिळाला आहे.
तसेच सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कार भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मिळाला आहे. धोनीने २०११ च्या नॉटिंगघम कसोटीत धाबबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले होते. त्याबद्दल धोनीला हा पुरस्कार मिळाला आहे.
महिला पुरस्कारांमध्ये एलिसा पेरीने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार पटकावला आहे. एवढेच नव्हे तर पेरीने सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू, सर्वोत्तम महिला टी२० क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळवला आहे.
या व्यतिरिक्त सहसदस्य देशांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार स्कॉटलंडच्या कॅथरिन ब्राईसने जिंकला आहे.
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांची यादी-
सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू) – विराट कोहली
रॅचेल हेहो फ्लिंट पुरस्कार (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू) – एलिसा पेरी
सर्वोत्तम पुरुष कसोटीपटू – स्टिव्ह स्मिथ
सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू – विराट कोहली
सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू – एलिसा पेरी
सर्वोत्तम पुरुष टी२० क्रिकेटपटू – राशिद खान
सर्वोत्तम महिला टी२० क्रिकेटपटू – एलिसा पेरी
सहसदस्य देशांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू – काईल कोएत्झर
सहसदस्य देशांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – कॅथरिन ब्राईस
खिलाडूवृत्ती – एमएस धोनी (नॉटिंगघम कसोटी, २०११)
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष टी२० संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे संघ –
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी(यष्टीरक्षक/कर्णधार) , बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ –
ऍलिस्टर कूक, डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव स्मिथ, कुमार संगकारा(यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम महिला टी२० संघ –
एलिसा हिली (यष्टीरक्षक), सोफी डिवाइन, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टिफन टेलर, डेन्ड्रा डॉटीन, एलिसा पेरी, ऍना श्रुबसोल, मेगन शट आणि पुनम यादव
असा आहे आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम महिला वनडे संघ –
एलिसा हिली, सुझी बेट्स, मिताली राज, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टिफन टेलर, सारा टेलर (यष्टीरक्षक), एलिसा पेरी, डेन वॉन निकर्क, मेरीझन कॅप, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! ‘रनमशीन’ विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
अश्विनच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा कमाल, फसवले ‘या’ स्टार ऑस्ट्रेलियन बॅट्समनला