अल जजीरा या वृत्तवाहिनीने तीन वर्षांपूर्वी भारताचे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धचे कसोटी सामने फिक्स असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. २०१६ साली इंग्लंड विरूद्ध भारत यांचा झालेला सामना आणि २०१७ साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेला सामना, हे दोन्ही सामने फिक्स होते, असा दावा या वृत्तवाहिनीने केला होता. मात्र आता आयसीसीने हा आरोप सपशेल फेटाळून लावला आहे. ज्या पद्धतीने हे सामने फिक्स असल्याचे म्हंटले होते, त्यात काहीही तथ्य नसल्याचा निर्वाळा आयसीसीने दिला आहे.
एका माहितीपटातून केले होते आरोप
अल जजीरा या वृत्तवाहिनीने २०१८ साली ‘क्रिकेट मधील मॅच फिक्सर्स’ या नावाने एक माहितीपट प्रसारित केला होता. या माहितीपटात भारतीय संघाचे दोन कसोटी सामने फिक्स करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यात २०१६ साली इंग्लंड विरूद्धचा चेन्नई येथील सामना आणि २०१७ साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध रांची येथे खेळवला गेलेला सामना, यांचा समावेश होता. यात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळाला होता तर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. मात्र काही सट्टेबाजांच्या हवाल्याने हे सामने फिक्स असल्याचा दावा अल जजीराने केला होता.
आरोप नाही झाले सिद्ध
क्रिकेट मधून भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या प्रयत्नाला आयसीसीने मागील काही काळात चांगलाच वेग आणला आहे. याच अंतर्गत अल जजीराने केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांची देखील चौकशी केली गेली. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हे स्पष्ट करण्यात आले की २०१८ साली करण्यात आलेल्या या आरोपांची विशेष तज्ञांच्या समितीद्वारे सखोल चौकशी करण्यात आली.
मात्र या चौकशीत फिक्सिंगचे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. तसेच जे आरोप करण्यात आले होते, त्याला फिक्सिंग म्हणता येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले. आयसीसीच्या म्हणण्यानुसार खेळाच्या ज्या भागाला फिक्स म्हंटल्या गेले ते केवळ अपेक्षित होते, त्याला फिक्सिंग म्हणता येणार नाही. इतकेच नव्हे तर तर या माहितीपटात ज्या पाच आरोपींची नावे घेण्यात आली, त्यांना देखील आयसीसीने क्लीन चिट दिली आहे. आयसीसीनुसार त्यांचे व्यवहार संशयास्पद होते, मात्र त्यांना फिक्सिंग ठरवण्यासाठी एकही पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही. अर्थात आयसीसीने या नावांचा खुलासा करण्याचे मात्र टाळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्जन नागवासवालाचा मोठा खुलासा, प्रारंभीच्या काळात या भारतीय गोलंदाजाची करायचा कॉपी
व्हिडिओ : कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोहलीची विकेट घेणार का? साउदीने दिले ‘हे’ उत्तर






