क्रिकेटविश्वात आजपासून (७ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताबरोबर श्रीलंकाही भुषवत आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी जाहीर केलेल्या अनेक संघांमध्ये बदल केले गेले. खेळाडूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया, भारत , दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडबरोबर अनेकांना त्यांच्या संघात बदल करावा लागला. आता श्रीलंकेनेही त्यांच्या संघात नव्या खेळाडूची निवड केली आहे.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इशान मलिंगा आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याला नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत खांद्याची दुखापत झाली. यामुळे त्याला टी२० विश्वचषकाला मुकावे लागत आहे. त्याच्याजागी प्रमोद मदुशनला संघात निवडले गेले आहे.
मलिंगाला मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चेंडू टाकताना खांद्याची दुखापत झाली. या सामन्यात पाऊस पडल्यानंतर सामना सुरू झाल्यावर चेंडू टाकताच तो जमिनीवर पडला. यामुळेच तो तिसऱ्या सामन्यातही खेळला नव्हता.
मलिंगाने २०२५च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना त्याने ८ टी२० सामन्यांमध्ये ९.४१च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची जागा घेणाऱ्या मदुशनने २०२२मध्ये पदार्पण करत ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने या प्रकारातील शेवटचा सामना २०२३मध्ये खेळला होता. तसेच त्याने ८.६३च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट्स घेतल्या आहेत.
या स्पर्धेतील श्रीलंकेचा पहिला सामना ८ फेब्रुवारीला आहे. हा सामना आर्यलंडविरुद्ध असून कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. ग्रुप बी मध्ये असणारा श्रीलंका सुपर – ८ मध्ये पोहोचण्यासाठी ओमान, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेशी दोन हात करेल.
भारताचाही वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने एकच षटक टाकले आणि लंगडतच मैदान सोडले. त्याच्याजागी मोहम्मद सिराज विश्वचषकात खेळणार आहे.






