---Advertisement---

युएसएविरुद्ध सूर्या एंड कंपनीला इतिहास रचण्याची संधी, टी20 वर्ल्डकपमध्ये कोणीच नाही केला ‘हा’ पराक्रम

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 11:33 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरूवात झाली आहे. भारत पहिल्याच दिवशी युएसएशी भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्याला सुरूवात संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारताकडे मोठा इतिहास रचण्याची संधी आहे.

पुरूष टी२० विश्वचषकात लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रम करण्याची संधी भारताकडे आहे. भारत या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मागील टी२० विश्वचषकात भारताने युएसएविरुद्ध सामना जिंकला आहे. त्यामुळे आता हा पराक्रम पुन्हा करताच भारत या स्पर्धेत लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरणार आहे.

टी२० विश्वचषकात भारताने मागील ८ सामने लागोपाठ जिंकले आहेत. संघाने २०२४च्या टी२० विश्वचषकात एकही सामना गमावला नव्हता. त्यामधील कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने त्या स्पर्धेत लागोपाठ ८ विजय मिळवले आणि नंतर अंतिम सामन्यात भारताकडून पराभूत झाले.

ऑस्ट्रेलियानेही टी२० विश्वचषक २०२२-२०२४ मधील सामने मिळून लागोपाठ ८ सामने जिंकले आहेत. यामुळे भारताने आजच्या सामन्यात युएसएला हरवले तर यजमान संघ टी२० विश्वचषकाच्या इतिहासात लागोपाठ ९ सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरेल.

भारताचा टी२० संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अनेक मालिका जिंकत आला आहे. नुकतेच संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा ४-१ असा पराभव केला आहे. यामुळे गतविजेत्या भारताचे या स्पर्धेत अपराजित राहण्याचे प्रयत्न असणार आहे.

टी२० विश्वचषकात लागोपाठ सर्वाधिक विजय मिळवणारे संघ-
८* – भारत (२०२४)
८ – दक्षिण आफ्रिका (२०२४)
८ – ऑस्ट्रेलिया (२०२२-२०२४)
७ – भारत (२०१२-२०१४)
६ – भारत (२००७-२००९)
६ – श्रीलंका (२००९)
६ – इंग्लंड (२०१०-२०१२)
६ – दक्षिण आफ्रिका (२०२१-२०२२)

टी२० विश्वचषक २०२६साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---