फेब्रुवारी ७ पासून सुरू झालेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला त्यांचे फायनालिस्ट मिळाले आहे. यामध्ये रविवारी (८ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांची टी२० मधील समोरा-समोरची कामगिरी पाहू, तसेच आयसीसी स्पर्धा आणि टी२० विश्वचषकात कोण ठरलाय सरस हे पण जाणून घेऊ.
न्यूझीलंडने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरीकडे भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० टी२० सामने खेळले गेले. त्यामधील १८ भारताने जिंकले असून ११ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
टी२० विश्वचषकात हे दोन संघ तीनदा समोरा-समोर आले आहेत. २००७च्या जोहान्सबर्गमध्ये हे पहिल्यांदा भिडले. त्यामध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू डॅनियल विट्टोरीची कामगिरी अप्रतिम राहिली. त्याने ४ षटकात २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने ५ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताला १९० धावसंख्येचे लक्ष्य मिळाले होते. तो सामना न्यूझीलंडने १० धावांनी जिंकला.
२०१६मध्ये नागपूरच्या मैदानात पुन्हा हे दोन संघ आमने-सामने आले. तेव्हा भारताने न्यूझीलंडला १२६ धावसंख्येवर रोखले होते, मात्र फलंदाजांनी निराशा केली. त्यावेळी भारत १८.१ षटकात ७९ धावांवरच गारद झाला. त्यामधील ९ विकेट्स फिरकीपटूंनी घेतले होते. तसेच मिचेल सॅंटनरची कामगिरी प्रभावी राहिली. त्याने ४ षटकात ११ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. ईश सोधीने ४ षटकात १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
दुबईमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना त्रास दिला. २०२१मध्ये झालेल्या त्या सामन्यात २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ ११० धावा करू शकला. रविंद्र जडेजाने सर्वोच्च धावा केल्या होत्या. त्याने १९ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १४.३ षटकातच ८ विकेट्स शिल्लक राखत लक्ष्य गाठले.
टी२० विश्वचषकातील न्यूझीलंडची भारताविरुद्धची कामगिरी पाहता भारताला पुन्हा एकदा कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे सध्याचे सलामीवीर फिन ऍलन आणि टीम सेफर्ट चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. यामुळे भारताला सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तसेच टी२० विश्वचषकाआधी दोन्ही संघांनी पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली. त्यामध्ये भारत ४-१ असा जिंकला होता.






