आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (८ मार्च) अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागील दोन सामन्यांत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहच्या एका खास यादीत प्रवेश करण्याची संधी आहे. संजूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या होत्या. स्पर्धेत टिकण्यासाठी भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध सामना जिंकणे महत्वाचे होते. तसेच त्याने इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही ८९ धावा केल्या.
संजूने न्यूझीलंडविरुद्धही भारताच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडत उत्तम कामगिरी केली तर तो मालिकावीर ठरू शकतो. आयसीसीने अंतिम सामन्याआधी मालिकावीराचे नामांकन जाहीर केले आहे. त्या ८ खेळाडूंमध्ये भारताचा केवळ संजू आहे. तसेच यामध्ये विल जॅक्स (इंग्लंड), साहिबजादा फरहान (पाकिस्तान), लुंगी एनगिडी (दक्षिण आफ्रिका), एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका), रचिन रविंद्र (न्यूझीलंड), टीम सेफर्ट (न्यूझीलंड) आणि शेडली वॅन शाल्कविक (यूएसए) यांचा समावेश आहे.
मागील नऊ टी२० विश्वचषकाच्या आवृत्तीत २००७ ते २०२४ दरम्यान वेगवेगळे ८ खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरले आहेत. यामध्ये भारताचा दिग्गज विराट कोहली एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने दोनदा हा मान पटकावला आहे. भारताकडून टी२० विश्वचषकाच्या इतिहासात मालिकावीराचा मान कोहलीबरोबर बुमराहलाही मिळाला आहे.
कोहली २०१४ आणि २०१६ मध्ये मालिकावीर ठरला आहे. तसेच बुमराहने २०२४मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. आता संजूचाही या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.
आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकाचे मालिकावीर (आतापर्यंतचे)-
२००७ – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
२००९ – तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
२०१० – केविन पीटरसन (इंग्लंड)
२०१२ – शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
२०१४ – विराट कोहली (भारत)
२०१६ – विराट कोहली (भारत)
२०२१ – डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
२०२२ – सॅम करन (इंग्लंड)
२०२४ – जसप्रीत बुमराह (भारत)






