भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आणि विक्रमी तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला गेला. त्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. भारतीय संघ जल्लोषात व्यस्त होते आणि आता खेळाडूही आपापल्या घरीही परतले आहेत, तेथे त्यांचे जोरदार स्वागत झाले आहे. विश्वविजेतेपद जिंकल्याच्या ३ दिवसाच्या आताच भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मात्र अडचणीत आला आहे. त्याच्या विरुद्ध एकाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकविरुद्ध पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका स्थानिक वकिलाने केली आहे. वाजिद खान यांनी हार्दिकने विजयाच्या उत्सवावेळी राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला. पांड्या स्टेजवर त्याच्या शरीराभोवती राष्ट्रध्वज गुंडाळलेला दिसत आहे आणि त्याची साथीदारदेखील त्याच्यासोबत स्टेजवर पडलेल्या स्थितीत दिसत आहे, असे त्या तक्रारीमध्ये वाजिद यांनी म्हटले आहे. त्यांनी हा लेखी अर्ज दिला असून हार्दिकची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
भारताच्या विजयाचे अनेक खेळाडूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये हार्दिकचा व्हिडिओ वादग्रस्त ठरत आहे. त्यामध्ये तो खांद्यावर तिरंगा ओढून मैदानावर धावताना आणि नाचताना दिसत आहे. वाजिद यांनी त्याचे हे वर्तन राष्ट्रध्वाजाच्या सन्मानाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
“भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि यासाठी कायदा अस्तित्वात आहे. राष्ट्रध्वाजाशी संबंधित कायद्यामुळे मी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे,” असे वाजिद म्हणाले आहेत.
“ही घटना अहमदाबादमध्ये घडली होती. त्यामुळे पोलिसांनी तिथेच तक्रार दाखल करावी असे सुरूवातीला सांगितले. राष्ट्रध्वज हा संपूर्ण देशाचे प्रतीक आहे आणि त्याच्या प्रतिष्ठा संबंधित मुद्दे कुठेही उपस्थित केले जाऊ शकतात,” असेही वाजिद यांनी पुढे सांगितले आहे.
वाजिद म्हणाले, “मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी माझी ही तक्रार स्विकारली असून मला एक प्रतही दिली आहे. आता पुढे काय होते ते पाहुया.”
या स्पर्धेत हार्दिकने अनेक सामन्यांमध्ये भारताच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने ९ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने दोन अर्धशतकांसह २१७ धावाही केल्या. तो २०२४ टी२० विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्यामुळे तो आता दोन वेळेचा टी२० विश्वविजेता ठरला आहे.






