अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया (Team india vs England) इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणारी 3 वनडे सामन्यांची ही मालिका 2027 च्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेचे महत्त्व लक्षात घेता, स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) आतापासूनच विशेष तयारी सुरू केली आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट कोहलीने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यासोबत अलीबागमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. कोहली स्वतःही अलीबागमध्ये बराच वेळ घालवत असतो. भारतात जेव्हा जेव्हा विराट सरावासाठी मैदानात उतरतो, तेव्हा त्याला मदत करण्यासाठी संजय बांगर नेहमी हजर असतात. बांगर यांनी आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) सोबतही काम केले आहे, त्यामुळे त्या दोघांचे नाते खूप दृढ आहे.
आयपीएल 2026 नंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे विराटला खेळता आले नव्हते. त्यामुळे आता दुखापतीतून सावरून तो थेट इंग्लंड टीमविरुद्धच्या मालिकेत उतरणार आहे. किंग कोहली पूर्ण लयीत परतण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो जोरदार कामगिरी करू शकेल.
विराट कोहलीने जानेवारीत शेवटचा सामना टीम इंडियासाठी खेळला होता, त्यानंतर तो भारतीय संघात दिसला नाही. अशा स्थितीत त्याला पुन्हा एकदा ‘ब्लू जर्सी’मध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. जुलै महिन्यात चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार असून, विराट पुन्हा मैदानात (Virat Kohli comback after injury) धडाकेबाज पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.






