बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केल्यानंतर अर्शदीप सिंगला मोठा फायदा झाला आहे. या युवा वेगवान गोलंदाजानं कारकिर्दीत प्रथमच टी20 क्रमवारीत अव्वल 10 मध्ये प्रवेश केला. अर्शदीप बुधवार, 9 ऑक्टोबर रोजी अपडेट केलेल्या आयसीसी रँकिंगमध्ये 16 व्या स्थानावरून झेप घेत 8 व्या स्थानावर पोहोचला. अर्शदीप सिंगचं यापूर्वीचं सर्वोत्कृष्ट रँकिंग 13वं होतं.
गोलंदाजांच्या आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल 10 मध्ये अर्शदीप हा एकमेव भारतीय आहे. या लिस्टमध्ये इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या, तर वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन दुसऱ्या स्थानावर आहे. ग्वाल्हेरमधील पहिल्या टी20 सामन्यासाठी निवड न झालेला रवी बिश्नोई ताज्या क्रमवारीत एका स्थानानं घसरून 12व्या स्थानावर आला.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अष्टपैलू हार्दिक पांड्याला देखील चार स्थानांचा फायदा झाला. तो अष्टपैलू खेळाडूंच्या टी20 क्रमवारीत पहिल्या तीनमध्ये परतला आहे. इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन 253 रेटिंग गुणांसह या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. जूनमध्ये भारताच्या टी20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी दुसऱ्या स्थानावर आहे.
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतानं सात गडी राखून मोठा विजय मिळवला. या विजयात अर्शदीप सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजानं 3.5 षटकात केवळ 14 धावा देत तीन बळी घेतले. पंजाब किंग्जच्या या खेळाडूनं लिटन दास आणि परवेझ इमानची विकेट घेत बांगलादेशला सुरुवातीलाच झटके दिले. या शानदार गोलंदाजीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हेही वाचा –
अजिबात ब्रेक नाही! कसोटी मालिकेसाठी हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO पाहा
धोक्याची घंटा! जो रुट थांबायचं नाव घेईना, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार?
एकेकाळी आपल्या गोलंदाजीनं केलं भल्या-भल्यांना गार, आता टीम इंडियामध्ये या दिग्गजाचं पुनरागमन अशक्य!