आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये गतविजेत्या भारताला या स्पर्धेत रविवारी (२२ फेब्रुवारी) पहिला धक्का बसला. यामुळे निराश झालेल्या संघांच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा दुखापतग्रस्त असल्याचे कळते आणि संघ व्यवस्थापकांनी ते पुढे येऊ दिले नाही. या स्पर्धेत अभिषेकची म्हणावी तशी काही खास कामगिरी झाली नाही. त्याने ४ सामन्यांत केवळ १५ धावा केल्या. यामुळे त्याच्या या वाईट कामगिरीसाठी त्याची दुखापत जबाबदार असल्याचे मानले जात आहे.
काही सूत्रानुसार, स्पर्धेच्या आधी झालेल्या संघाच्या ऑफिशियल फोटोशूटवेळी अभिषेकच्या हाताला दुखापत झाली होती. ती दुखापत एवढी गंभीर होती की त्याला टाके (स्टिचेस) लावावे लागले. या दुखापतीचा विचार न करता त्याने स्पर्धेत सुरूवातीला फलंदाजी केली. यूएसएविरुद्धच्या त्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आता त्याच्या जखमेबाबत ही जोखीम (रिस्क) का घेतली गेली, हा प्रश्न निर्माण होतो.
तसेच या स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक खेळला नाही. तेव्हा त्याला पोटाचा संसर्ग झाल्याचे कळले. त्यामुळे त्याला दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि तो नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला. तेव्हा संजू सॅमसनला संधी मिळाली होती.
अभिषेकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८च्या सामन्यात चौकार मारत या स्पर्धेतील त्याची पहिली धाव घेतली. यामुळे तो फॉर्ममध्ये परतला असे वाटत असताना १२ चेंडूत १५ धावा करत बाद झाला. त्याने या स्पर्धेत नकोसा विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्याने शून्याची हॅट्ट्रीक केली. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत चर्चा सुरू झाल्या. अशातच त्याची ही दुखापत समोर येणे चिंतेची बाब ठरत आहे.
या स्पर्धेत भारताला दोन सुपर-८चे सामने खेळायचे आहेत. ते सामने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी गतविजेत्याला हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला आता सलामीच्या जोडीबाबत योग्य तो निर्णय घ्याला लागणार आहे. कारण संजू ज्या सामन्यात खेळला तेव्हाच भारताची सलामीची भागीदारी दुहेरी अंकी झाली नाहीतर बाकी सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट गमावली आहे.






