आयसीसी पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६चे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये भारताने पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईमध्ये यूएसएविरुद्ध खेळला. हा सामना भारताने २९ धावांनी जिंकला आणि एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. या स्पर्धेत आतापर्यंत एकाही संघाला ही कामगिरी करता आली नाही.
भारताने मागील टी२० विश्वचषकात सलग ८ सामने जिंकत विजेतेपदावर नाव कोरले होते. आता या आवृत्तीत पहिल्याच सामन्यात यूएसएचा पराभव करत लागोपाठ ९ विजय मिळवण्याची कामगिरी केली. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग सर्वाधिक विजय मिळवणारा भारत एकमेव संघ ठरला आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी ८-८ वेळा अशी कामगिरी करत संयुक्तपणे पहिले स्थान गाठले होते. भारत आता त्यांच्यापुढे गेला आहे. यामुळे हे दोन्ही संघ संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. तिसऱ्या स्थानावर भारतच आहे. भारताने २०१२-१४च्या टी२० विश्वचषकादरम्यान सलग ७ विजय मिळवले होते.
भारताच्या या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ९ विकेट्स गमावत १६१ धावसंख्या उभारली होती. सूर्यकुमारमुळे भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली. त्याने संघाची स्थिती ७७ धावांवर ६ विकेट्स अशी असताना स्फोटक खेळी केली. त्याने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८४ धावा केल्या.
सूर्यानंतर भारताला जिंकण्याचा मोर्चा गोलंदाजांनी सांभाळला. यामध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी यूएसएला सुरूवातीला धक्के दिले. दोघांनी केलेल्या धमाकेदार सुरूवातीने यूएसएची स्थिती ३.२ षटकात ३ बाद १३ धावा अशी झाली होती. वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल यांनीही त्यांचे योगदान दिले आणि भारताचा विजय निश्चित केला. भारताचा पुढील सामना १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध आहे.
टी२० विश्वचषकांमध्ये सलग सर्वाधिक विजय
९ – भारत (२०२४-२६) *
८ – दक्षिण आफ्रिका (२०२४)
८ – ऑस्ट्रेलिया (२०२२-२४)
७ – भारत (२०१२-१४)






