विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत पुढील महिन्यात भारत आणि न्युझीलंड या संघात अंतिम सामना रंगणार आहे. 18 जून ते 22 जूनदरम्यान हा सामना खेळला जाणार असून दोन्ही संघ पहिल्यावहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असतील . न्युझीलंडचा संघ याआधीच इंग्लंडला पोहोचला असून या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड सोबत एक कसोटी मालिका खेळतील तर भारतीय संघ मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये असून आपला विलगिकरण कालावधी पूर्ण करून 2 जून ला इंग्लंड ला रवाना होईल .
भारतीय संघाचा इतिहास बघितल्यास त्याला विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये जास्त मालिका जिंकता आलेल्या नाहीत, परंतु मागील काही वर्षांपासून भारतीय संघाने आपल्या कामगिरीत मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे आणि याचे मोठ्या प्रमाणात श्रेय कर्णधार विराट कोहलीच्या मानसिकतेला दिले जाते, कोहलीने गोलंदाजीला धार येण्यासाठी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त गोलंदाजांवर विश्वास दाखवला आहे. सामना जिंकण्यासाठी सगळ्याच खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असली तरी अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ ज्यांची कामगिरी भारतीय संघाचं भविष्य ठरणार आहे.
5) रवींद्र जडेजा :-
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ‘सर’ रवींद्र जडेजा आपल्या संघासाठी तारणहार ठरत असून, त्याने आपल्या फलंदाजीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. एक गोलंदाज म्हणुन त्याचे संघात महत्वाचे स्थान असले तरी त्याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा संघासाठी मोलाचे ठरत आहे. जडेजाच्या नावावर आतापर्यन्त 51 कसोटी सामन्यात एकूण 1954 धावा आणि 220 विकेट्स आहेत.
जडेजाने अष्टपैलू कामगिरी करून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी जिंकून देण्यात आणि तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखून देण्यात योगदान दिले होते आणि त्यामुळे भारताला बॉर्डर-गावस्कर मालिका विजय मिळवण्यात मदत झाली होती. न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाला जडेजाकडून अशाच अष्टपैलू कामगिरीची आशा राहील.
4) जसप्रीत बुमराह:-
आताच्या घडीचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला ओळखले जाते . बुमराहने आतापर्यंत भारतासाठी एकूण 19 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने तब्बल 83 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. न्युझीलंड विरुद्ध त्याने फक्त 2 सामने खेळले आहे, ज्यात 6 विकेट्स घेतलेल्या आहेत. परंतु, इंग्लडमध्ये तो एकूण 3 सामने खेळला असून त्यात 16 विकेट्स त्याने पटकावल्या आहेत, ज्यात एका डावात 5 विकेट्सचा समावेश आहे. न्युझीलंड विरुद्धच्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात त्याची गोलंदाजी महत्वपूर्ण ठरेल.
3) विराट कोहली:-
क्रिकेटच्या सार्वकालीन महान फलंदाज म्हणून विराट कोहली ओळखला जातो. त्याने आपल्या फलंदाजीने सर्व क्रिकेट प्रकारात यश प्राप्त केलंय. अंतिम सामन्यात एक प्रमुख आणि प्रभावी खेळाडू म्हणून सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. मागील अनेक सामन्यात त्याला मोठी खेळी करता आलेली नसून या अंतिम सामन्यात त्याच्या चांगल्या खेळीची आशा सगळ्या चाहत्यांना असले. मागच्या वेळी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खूपच शानदार फलंदाजी कोहलीने करून आपल्या आकड्यांमध्ये सुधारणा केली होती, तसेच यावेळीही अशाच खेळीची अपेक्षा त्याला असेल .
2) रोहित शर्मा :-
मागील काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा एक सर्वोत्तम सलामीवीर म्हणून नावारूपास येत आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटच्या या प्रमुख खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा स्वतः ला सिद्ध करून दाखवलंय . रोहितने सलामीला येताना एकूण 11 कसोटी सामन्यात 64.37 च्या शानदार सरासरीने एकूण 1030 धावा केल्या आहेत . तसेच त्याशिवाय ऑस्ट्रेलियात जाऊन 4 डावात अर्धशतक करून आपलं नाणं विदेशी खेळपट्टीवर देखील खणखणीत वाजून दाखवलं आहे. न्युझीलंड विरुद्ध रोहित शर्माकडून शानदार सुरवातीची अपेक्षा भारतीय संघाला असेल
1) रिषभ पंत:-
मागच्या वर्षीपासून भारतीय संघासाठी तारणहार कामगिरी रिषभ पंत करीत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात भारताने जिंकलेल्या मालिकेत या खेळाडूने शानदार कामगिरी केली होती . ज्या प्रकारे तो फलंदाजी करतो तो बेदरकारपणे गोलंदाजीवर तुटून पडतो आणि विरुद्ध संघाची रणनीती खराब करून टाकतो. अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी या खेळाडूची कामगिरी महत्वाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“पंतमध्ये धोनीच्या नेतृत्वाची झलक दिसते”, माजी भारतीय खेळाडूची रिषभवर स्तुतीसुमने
‘या’ कारणामुळे इंग्लंडचे फलंदाज अक्षर पटेलविरुद्ध ठरले अपयशी, फिरकीपटूनेच केला खुलासा
‘रियुनियन हे लहान मुलांचे होते, दिग्गज कायम एकत्रच असतात’, भारतीय दिग्गजाची मजेशीर पोस्ट