---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशिप: विजयानंतरही फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला टेंशन; अशी आहेत समीकरणे

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 1:43 PM
---Advertisement---

चेन्नई। भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात १६४ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेशाबाबतची समीकरणेही काहीशी बदलली आहेत.

भारत आणि इंग्लंड संघात होत असलेली मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेनंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणते दोन संघ खेळणार हे निश्चित होणार आहे.

न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी केवळ १ जागा शिल्लक असल्याने चुरस वाढली आहे. सध्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ३ संघात स्पर्धा आहे; हे तीन संघ म्हणजे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया.

सध्या या मालिकेतील दुसरा सामना जिंकल्याने भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ६९.७ टक्क्यांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंड संघ ६७ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ६९.२ टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पण असे असले तरी भारत-इंग्लंड मालिका संपेपर्यंत तरी न्यूझीलंडबरोबर कोणता संघ अंतिम सामना खेळणार हे निश्चित होणार नाही. त्यामुळे या मालिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तर आपण भारत-इंग्लंड मालिकेच्या चेन्नईतील दुसऱ्या कसोटीनंतर कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीची भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी काय समीकरणे आहेत ते पाहू.

…तर भारत पोहचेल अंतिम सामन्यात 
भारताने जर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकली तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होऊ शकतो. म्हणजेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने कमीत कमी २ सामने जिंकून विजय मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात पराभव टाळावाच लागणार आहे. भारत एक जरी सामना पराभूत झाला तर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर होईल.

अशी आहेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांसाठी समीकरणे
ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी त्यांनाही अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

जर भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवली किंवा जर भारत इंग्लंडविरुद्ध २-१ अशा फरकाने पराभूत झाला तर ऑस्ट्रेलिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यात त्यांची अपेक्षा असेल की एकतर ही मालिका बरोबरीत सुटावी किंवा इंग्लंडने ३ पेक्षा कमी सामने जिंकून या मालिकेत विजय मिळवावा.

तसेच इंग्लंडचा विचार करता, त्यांना जर कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभूत करावेच लागणार आहे. म्हणजे त्यांना भारताविरुद्ध कसोटी मालिकेत कमीत कमी ३ सामने जिंकूनच विजय मिळवावा लागणार आहे.

लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना यावर्षी जून महिन्यात लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडला अंतिम सामन्याचे तिकीट
ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची सद्य परिस्थिती बघता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच कारणाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत महत्वाचे बदल झाले.

न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड यानंतर कोणतीही मालिका खेळणार नाही आहे. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची शरणागती, तब्बल ३१७ धावांनी टीम इंडियाचा दणदणीत विजय

अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत

विजय पथावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिल ‘या’ कारणामुळे दुसऱ्या डावाबाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---