शनिवारी (५ फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यात १९ वर्षाखालील विश्वचषकाचा (u19 world cup final) अंतिम सामना खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडवर वर्चस्व निर्माण केले. रवी कुमार (Ravi Kumar) याने सुरुवातीच्या षटकांमध्ये इंग्लंडच्या वरच्या फळीतील दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तसेच अष्टपैलू राज बावा (Raj Bawa) याने मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा पुढे योग्य फायदा घेत इंग्लंडच्या फलंदाजांना एकापाठोपाठ तंबूत पाठवण्याचे काम केले.
१९ वर्षीय राज बावाने या सामन्यात एकूण ९.५ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ३१ धावा खर्च करून पाच महत्वाच्या विकेट्स घेतल्या. बावाच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडची वरची आणि मधली फळी पूर्णपणे उध्वस्त झाली. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या पाच विकेट्स अवघ्या ४७ धावांवर गमावल्या होत्या. बावाने त्याच्या पहिल्या तीन षटकांमध्ये तीन विकेट्स घेतल्या. चौथ्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर चौथी विकेट त्याने डावाच्या १७ व्या षटकात घेतली, तर पाचवी विकेट ४५ व्या षटकात घेऊन इंग्लंडला सर्वबाद केले.
राज बावाने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर रवी कुमारने चार विकेट्स नावावर केल्या. त्याव्यतिरिक्त कौशल तांबेला एक विकेट मिळाली. राज बावाच्या शॉर्ट पिच चेंडूवर इंग्लंडचे फलंदाज अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळाले. तत्पूर्वी, विश्वचषकातील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बावाने ४ विकेट्स घेतल्या होत्या. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही त्याने विश्वचषक स्पर्धेत कमाल दाखवली. युगांडाविरूद्ध बावाने १६२ धावा केल्या होत्या. १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय खेळाडूने केलली ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे.
दरम्यान, राज बावाची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे त्याचे वडील सुखविंदर बावा. सुखविंदर बावा भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचे प्रशिक्षक होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला युवराजला सुखविंदर बावांचे मार्गदर्शन लाभले होते. तसेच भारतीय संघात निवड झाल्यानंतर देखील त्याने अनेकदा त्यांच्या मार्गदर्शन सराव केला. युवराजने २२ वर्षांपूर्वी २००० साली खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. युवराजच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने त्यावर्षी जेतेपद पटकावले होते. आता यावर्षीच्या १९ वर्षाखालील विश्वचषात राज बावाने अगदी युवराजप्रमाणेच खेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी.! वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंचा भारतीय संघात समावेश
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती
खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं






