आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 चा 10 वा सामना शारजाहच्या मैदानावर ‘अ’ गटात समाविष्ट असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 60 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाने मर्यादित 20 षटकांत 148/8 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंड संघ संपूर्ण षटक न खेळता डावात चार चेंडू शिल्लक असताना 88 धावा करून सर्वबाद झाला. मेगन शुटने ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी केली. ज्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तिने टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ॲलिसा हिली आणि बेथ मुनी या जोडीने पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. ही भागीदारी सहाव्या षटकात संपुष्टात आली. कॅप्टन हिली 20 चेंडूत 26 धावा करून बाद झाली. तर मुनीने 32 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. एलिस पेरीने 24 चेंडूत 30 धावा केल्या, तर फोबी लिचफिल्डने 18 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. या चार फलंदाजांशिवाय इतर कोणालाही दुहेरी आकडी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकांत 1 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतर विकेट पडण्याचा सिलसिला सुरू झाला. जो 20 व्या षटकापर्यंत कायम राहिला. किवी संघाकडून फक्त तीन फलंदाजांनी दुहेरी आकडी धावा केल्या. त्यापैकी सर्वाधिक 29 धावा अमेलिया केरच्या बॅटमधून आल्या. तर सुझी बेट्सने 20 आणि ली ताहुहूने 11 धावा केल्या. या शिवाय इतर फलंदाज फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शुट आणि ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय नोंदवत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले असून त्यांचे 4 गुण आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडला मोठा पराभव पत्करावा लागला असून, संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. मात्र दोन सामन्यांत 2 गुण असूनही, चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडने भारतापेक्षा एक स्थान वर कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत 9 ऑक्टोबर रोजी टीम इंडियासाठी हा मुख्यतः करा किंवा मराचा सामना आहे. ज्यामध्ये संघाला श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. तरच टीम इंडियाला न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रन रेट ठेवता येईल.
हेही वाचा-
“2 कोटींमध्ये काय…”, ऑलिम्पिक पदक विजेत्याच्या वडिलांची मागणी म्हणाले, एक फ्लॅट…
शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने रचला इतिहास! मुल्तानमध्ये केली मोठी कामगिरी
भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट? कसे राहणार दिल्लीतील हवामान?